सांगलीतील 152 ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबणीवर!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीअखेर पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची सुरू असलेली लगबग व फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या परीक्षांमुळे सांगली जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुका एप्रिलपर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी व फेब्रुवारी 2026मध्ये संपणार आहे. त्यामुळे इच्छुकांची थोडीशी निराशा होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोरोना कालावधीमुळे एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. या निवडणुकांची घोषणा डिसेंबर 2020 मध्ये झाली आणि जानेवारी 2021 मध्ये या निवडणुका पार पडल्या होत्या. या 152 ग्रामपंचायतींची मुदत आता जानेवारी 2026 अखेरीला संपणार आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फटका ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना बसणार आहे. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षण व प्रभागरचनेत झालेल्या बदलामुळे लांबल्या होत्या. त्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि.10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. सध्या या निवडणुकीसाठी आरक्षण व अंतिम गट-गणनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर होईल. डिसेंबरअखेरीला मतदान होण्याची शक्यता आहे. या निवडणुका पार पडल्यानंतर महापालिकेची निवडणूक होणार आहे. सध्या मनपाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत झाली असून, त्यावर हरकती मागविण्यात येत आहे. तर, मतदार यादीदेखील या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे.
डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होऊन जानेवारीत ही निवडणूक पार पडणार आहे. जानेवारीअखेरपर्यंत या निवडणुका होतील. त्यानंतर जिह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. पहिल्या टप्प्यात प्रभागनिश्चिती, त्यानंतर आरक्षण सोडत, त्यानंतर मतदार यादी जाहीर होणार आहे. या कालावधीसाठी दोन-तीन महिने जातील. शिवाय फेब्रुवारीमध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मार्चअखेरीपर्यंत या परीक्षा होणार आहेत. तर एप्रिल महिन्यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा असणार आहेत. या परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत चालू राहणार आहेत. त्यामुळे एप्रिलअखेरपर्यंत निवडणुकीसाठी शाळा, महाविद्यालयांच्या खोल्या मिळणार नाहीत; तसेच शिक्षकदेखील उपलब्ध होणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात अडथळा निर्माण करता येणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका या एप्रिल 2026 नंतरच होतील. जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुका तीन-चार महिने लांबणीवर पडणार आहेत.
थेट सरपंच निवड होणार…
महायुतीच्या काळात सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर थेट सरपंच निवड रद्द करण्यात आली. सरपंच निवड सदस्यांतून झाली. आता राज्यात पुन्हा युतीचे सरकार आल्याने सरपंच थेट लोकांमधून निवडण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतदेखील झाली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या निवडणुका पार पडतील, अशी आशा होती. पण निवडणुका आता लांबणीवर जाणार आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायती
तासगाव – 41, जत – 30, मिरज – 20, पलूस – 14, खानापूर- 13, कवठेमहांकाळ – 11, आटपाडी – 10, कडेगाव – 9, शिराळा – 2, वाळवा – 2
Comments are closed.