आक्रमक होत रूपाली ठोंबरेंचा मतमोजणी केंद्रावर गोंधळ; जाळीवर चढून आत उडी मारण्याचा प्रयत्न, आता
Rupali Patil Thombare: पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवार रूपाली ठोंबरे पाटील यांनी मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ घातल्याची घटना घडली. मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी थेट जाळीवर चढून आत उडी मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Rupali Patil Thombare: भाजपवर आणि निवडणूक यंत्रणेवर आरोप
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रूपाली पाटील यांनी भाजपवर थेट गंभीर आरोप केले आहेत. “भाजपने ईव्हीएम मशीन बदलल्या आहेत आणि निवडणूक अधिकारी देखील हायजॅक करण्यात आले आहेत,” असा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, “मतमोजणीदरम्यान ज्या मशीनवर सील लावण्यात आले होते, त्या सील मतमोजणीच्या दिवशी आधीच तुटलेल्या अवस्थेत आढळल्या. आम्ही याबाबत तक्रार केली, मात्र निवडणूक अधिकारी आमचे म्हणणे ऐकण्यास तयार नव्हते.”
Rupali Patil Thombare: पोलिसांवरही एकतर्फी भूमिकेचा आरोप
रूपाली पाटील यांनी पोलिसांवरही पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप केला. “उमेदवारांना मतमोजणी केंद्रात प्रवेशाचा अधिकार असतो, मात्र आम्हालाच आत येऊ दिले नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत त्यांनी, “या प्रकरणात मी थेट उच्च न्यायालयात दाद मागणार आहे,” असे जाहीर केले. तसेच, “राजकारणातील डावपेच आम्हाला माहिती आहेत, पण ईव्हीएममध्ये अशा प्रकारे फेरफार करून निवडणूक लढवणं ही कुठली लोकशाही पद्धत आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “मतदानाच्या दिवशी जी आकडेवारी होती, ती मतमोजणीच्या दिवशी जुळत नाही. हे असं कसं शक्य आहे?” अशी भूमिका देखील त्यांनी मांडली आहे.
Rupali Patil Thombare: रुपाली ठोंबरे पाटील यांचा पराभव
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा पराभव झाला आहे. प्रभाग 25 आणि 26 अशा दोन प्रभागातून त्या निवडणूक लढवत होत्या. मात्र, दोन्ही ठिकाणी त्या पराभूत झाल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुण्यात मोठा धक्का बसलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.