अहिल्यानगरमध्ये महायुतीत उमेदवारीचा पेच कायम, एकत्र लढण्यावर विखेंची सावध भूमिका

महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात महायुतीमध्ये अद्यापि अंतिम निर्णय झाला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एकत्र लढण्यावर सावध भूमिका घेत ‘आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे,’ असे संगत ठोस भूमिका मांडणे टाळले. मात्र, काही जागांवर एकमत नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.

शहरात उमेदवारीवरून महायुतीत संभ्रमाचे वातावरण आहे. भाजपकडे उमेदवारांची मागणी मोठी असली, तरी शहरात भाजपाचे वर्चस्व नसल्याचे वक्तव्य सुजय विखे-पाटील यांनी केले होते. त्यामुळे शहरात अजित पवार गटाचे वर्चस्व असल्याचे भाजपने अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महायुतीत मिंधे गटाला मनपा निवडणुकीत बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. कोणत्याही परिस्थितीत मिंधे गटाला उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. तर, मिंधे गटाने शहरात 25 ते 30 जागांची मागणी केल्यामुळे महायुतीतील तणाव अधिकच वाढला आहे.

काही जागांवर तडजोड नाही

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘आमच्याकडे उमेदवारीची मागणी मोठय़ा प्रमाणावर आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, काही जागांवर अद्यापि तडजोड झालेली नाही’, अशी स्पष्ट कबुली देत निवडणूक एकत्रित लढणार की नाही, या प्रश्नावर ठाम बोलणे टाळले. यावरून महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि उमेदवारीचा पेच कायम असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

Comments are closed.