मस्क यांची गाडी रुळावरून घसरलीय! डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली अमेरिका पार्टीची खिल्ली

अमेरिकेत नव्या पक्षाची स्थापना करणारे अब्जाधीश एलॉन मस्क यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खिल्ली उडवली आहे. ‘एलॉन मस्क यांची गाडी रुळावरून पुरती घसरल्याचे दुःख वाटते. त्यांनी तिसरा पक्ष सुरू करणे हास्यास्पद आहे. त्यातून राजकीय गोंधळ वाढण्यापलीकडे काहीही होणार नाही,’ असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प सरकारने मंजूर केलेल्या बिग ब्युटिफूल विधेयकामुळे संतापलेल्या मस्क यांनी अमेरिका पार्टीची स्थापना केली आहे. ट्रम्प यांनी दुसऱयाच दिवशी सोशल मीडियात पोस्ट लिहून मस्क यांच्यावर तोफ डागली.

तिसऱया पक्षाला स्थान नाही!

अमेरिकेत तिसरा पक्ष कधीच यशस्वी झाला नाही. इथल्या व्यवस्थेत तिसऱया पक्षाला स्थानच नाही. तरीही मस्क यांनी पक्ष काढला आहे. तिसरा राजकीय पक्ष फक्त गोंधळ घालण्यासाठी चांगला आहे. पण त्यासाठी कट्टरपंथी डावे डेमोक्रॅट्स पुरेसे आहेत. असेही ट्रम्प म्हणाले.

अमेरिका पार्टीच्या तिजोरीच्या चाव्या हिंदुस्थानी व्यक्तीकडे

एलॉन मस्क यांनी स्थापन केलेल्या अमेरिका पार्टीच्या तिजोरीच्या चाव्या हिंदुस्थानी वंशाचे वैभव तनेजा यांच्या हाती आल्या आहेत. मस्क यांनी त्यांची पक्षाच्या खजिनदारपदी निवड केली आहे. वैभव तनेजा हे टेस्ला कंपनीचे सीएफओ (चीफ फायनान्शियल ऑफिसर) आहेत.

Comments are closed.