X कडे वळलं संपूर्ण जग; वापराच्या बाबतीत फेसबुक-इन्स्टाला टाकलं मागे?
सोशल मीडियाच्या जगात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. उद्योगपती एलन मस्क यांच्या मालकीच्या X (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मने वापराचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले असून, ते आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील लोकांनी ताज्या अपडेट्ससाठी X ला पसंती दिल्याने हा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
एलन मस्क यांनी X वर माहिती शेअर करताना सांगितले की, प्लॅटफॉर्मने एकाच दिवसात जागतिक स्तरावर ४१७ अब्ज युजर-सेकंद (User-seconds) चा टप्पा ओलांडला आहे. हा आकडा X च्या इतिहासातील आजवरचा सर्वाधिक आहे. विशेषतः अमेरिकेमध्ये युजर-सेकंदचा आकडा ९३ अब्जवर पोहोचला असून, तो मागील विक्रमापेक्षा २३ टक्क्यांनी अधिक आहे. युजर-सेकंद हे मोजमाप लोक प्लॅटफॉर्मवर नेमका किती वेळ घालवत आहेत, हे दर्शवते.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामला मागे टाकले?
एलन मस्क यांनी शेअर केलेल्या या आकडेवारीनंतर आता X ने मेटाच्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामला मागे टाकले आहे का, अशी चर्चा रंगली आहे. जरी एकूण सक्रिय युजर्सच्या (Monthly Active Users) बाबतीत फेसबुक आणि इन्स्टाग्राम अजूनही पुढे असले, तरी रिअल-टाइम माहिती आणि ब्रेकिंग न्यूजसाठी लोकांचा ओढा X कडे प्रचंड वाढला आहे. ताज्या घडामोडींच्या वेळी X वरील एंगेजमेंट ही इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक असल्याचे मस्क यांच्या दाव्यावरून स्पष्ट होत आहे.
Comments are closed.