एल्फिन्स्टन पूलबाधितांना दिलासा, 12 रहिवाशांना घरे बदलून मिळणार; म्हाडाकडून नवीन घरांची शोधाशोध सुरू
एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांचे एमएमआरडीएकडून पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने म्हाडाकडून घरे विकत घेतली आहेत. यातील काही घरे पसंतीस न पडल्यामुळे ही घरे बदलून द्यावी अशी मागणी रहिवाशांनी केली होती. त्यानुसार ही घरे बदलून देण्याची विनंती एमएमआरडीएने म्हाडाला केली आहे. अखेर म्हाडाने आता या 12 रहिवाशांसाठी नवीन घरांचा शोध सुरू केला आहे.
वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन येथे सध्याचा पूल काढून एमएमआरडीएकडून डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे पुलाला लागून असलेल्या हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती बाधित होत आहेत. लक्ष्मी निवास या इमारतीत 60 तर हाजी नुरानी या इमारतीत 23 रहिवासी आहेत. संबंधित रहिवाशांना दादर, प्रभादेवी, वडाळा, लोअर परळ, भायखळा या भागातील म्हाडाची 83 घरे मालकी तत्त्वावर दिली जाणार होती. पाच रहिवाशांची इतरत्र व्यवस्था झाल्याने एमएमआरडीएने 78 घरे घेत त्यापोटी म्हाडाला 89 कोटी रुपये दिले आहेत. त्यानुसार एमएमआरडीएने संबंधित रहिवाशांना घराचा ताबा दिला. परंतु अॅण्टॉप हिल, दादर पूर्व आणि भायखळा येथील ज्या इमारतीत घरे मिळाली तेथील परिसर राहण्यास योग्य नसल्याने 12 रहिवाशांनी घरांचा ताबा न घेता चांगल्या ठिकाणची घरे देण्याची मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने म्हाडाला पत्र पाठवत सदर घरांच्या बदल्यात दुसरी घरे दिली जावीत अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत म्हाडानेही ही घरे बदलून देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे संबंधित रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Comments are closed.