पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय एल्फिन्स्टन पूल तोडू देणार नाही, रहिवाशांचा आमरण उपोषणाचा इशारा

वरळी शिवडी कनेक्टरमुळे बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय एल्फिन्स्टन पूल तोडणार नाही, असे आश्वासन सरकारने आम्हाला दिले होते; परंतु आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असतानाही सरकारने १० सप्टेंबरपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारने आम्हा रहिवाशांची सपशेल फसवणूक केली आहे. आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही एल्फिन्स्टन पूल तोडू देणार नाही. वेळ पडल्यास आम्ही सहकुटुंब पुलावरच आमरण उपोषणाला बसू, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन वरळी-शिवडी कनेक्टरला आमचा विरोध नाही पण आम्हा रहिवाशांचे याच विभागात पुनर्वसन व्हावे एवढीच आमची मागणी आहे. मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ आश्वासनांवर आमची बोळवण केली. पुनर्वसनाचा तिढा कायम असतानाही हा पूल बंद करण्याचा घाट घातला जातोय. गणेशोत्सवानंतर आम्ही सर्व रहिवासी आमरण उपोषणाला बसू.
मुनाफ ठाकूर, सचिव, हाजी नुराणी इमारत
पूल तोडण्यात येणार असून त्यावर डबलडेकर पुलाची उभारण्यात येणार आहे. या पुलाचे पीलर उभारण्यासाठी हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती बाधित होणार आहेत. आमचे पुनर्वसन याच विभागात होत नाही तोपर्यंत आम्ही एल्फिन्स्टन पूल तोडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका रहिवाशांनी घेतल्यामुळे या पुलाचे पाडकाम लांबणीवर पडले होते. एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाच्या परिसरातील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत बैठक घेतली होती. एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीएमार्फत केला जाईल, अशी घोषणा त्यावेळी त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली होती, मात्र चार महिने उलटून गेले तरी रहिवाशांना लेखी आश्वासन मिळालेले नाही.
एमएमआरडीसोबत बैठक होऊन चार महिने झाले तरी आम्हाला अद्याप पुनर्वसनासंदर्भात लेखी आश्वासन मिळालेले नाही. नगरविकास खात्याकडून नोटिफिकेशन आल्यावर आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देऊ असे सांगून एमएमआरडीएचे अधिकारी वेळ मारून नेतात. खरंतर आमचे पुनर्वसन करण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाहीये.
श्रीराम पवार, सचिव, परळ परिसर प्रभावित वेल्फेअर असोसिएशन
Comments are closed.