‘एल्फिन्स्टन’ रेल्वे पूल पाडकामाला; पुढील आठवड्यात सुरुवात, मध्य रेल्वे दोन तासांचे 19 ब्लॉक घेणार

एल्फिन्स्टन रेल्वे पूल पाडला

एल्फिन्स्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्याच्या प्रत्यक्ष कामाला पुढील आठवडय़ात सुरुवात होणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर सुरुवातीला प्रत्येकी दोन तासांचे 19 रात्रकालीन ब्लॉक घेऊन पुलाच्या गर्डर्सचे कटिंग करण्यात येणार आहे.

यासंदर्भात रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱयांशी चर्चा करून ब्लॉकचे अंतिम वेळापत्रक ठरवले जाणार आहे. तसेच एल्फिन्स्टन पुलाचा पश्चिमेकडील सांगाडा हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या ब्लॉकची आवश्यकता असून यासाठी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.

एल्फिन्स्टन पूल पाडून त्याजागी वरळी-शिवडी उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे आणि महारेल यांच्यात बैठका पार पडल्यानंतर अखेर मध्य रेल्वेवर दोन-दोन तासांचे 19 ब्लॉक घेऊन प्रत्यक्ष पाडकाम सुरू करण्यावर विविध प्रशासकीय यंत्रणांचे एकमत झाले आहे.

याव्यतिरिक्त अधिक तासांचा स्वतंत्र मेगाब्लॉक घेण्यासाठी आवश्यक रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तूर्तास रेल्वेकडून दोन तासांचे 19 ब्लॉक मिळून पुढील आठवडय़ात सोमवारी किंवा मंगळवारी पुलाचा लोखंडी सांगाडा हटवण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जैसवाल यांनी दिली.

लोकल-एक्प्रेसची वाहतूक कोलमडणार

मध्य रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळेस मोठय़ा प्रमाणावर लांब पल्ल्याच्या गाडय़ांची ये-जा सुरू असते. त्यामुळे 19 रात्रकालीन ब्लॉकमुळे लोकल ट्रेनबरोबरच मेल-एक्प्रेसच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची संभाव्य गैरसोय लक्षात घेऊन ब्लॉकचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याच दृष्टीने ब्लॉकचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनातील अधिकाऱयांनी दिली.

Comments are closed.