एल्विश यादवच्या घरावर गोळीबार; ‘भाऊ गँग’ने घेतली जबाबदारी, बेकायदेशीर बेटिंग ॲप्सच्या प्रमोशनशी

गुरुग्राम : वादग्रस्त यूट्यूबर आणि बिग बॉस OTT विजेता एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी आज (रविवारी) पहाटे झालेल्या अंधाधुंद झालेल्या गोळीबाराची जबाबदारी ‘भाऊ गँग’ने घेतली आहे. या हल्ल्यामागे यादवने बेकायदेशीर बेटिंग ॲप्सचे प्रमोशन केल्याचा आरोप गँगने केला आहे.

सोशल मीडियावर BHAU GANG SINCE 2020 अशा मजकुरासह दोन बंदुकांच्या ग्राफिकसह पोस्ट टाकून गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरीया यांनी हा हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आज एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करण्यात आला. तो नीराज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांनी केला. त्याने बेकायदेशीर बेटिंग अॅप्सचा प्रचार करून अनेक घरं उद्ध्वस्त केली आहेत. हा त्याच्यासारख्या सोशल मीडियावरील कीटकांसाठी इशारा आहे. अशा अॅप्सचा प्रचार करणाऱ्यांना कधीही फोन किंवा गोळी मिळू शकते.”

पहाटे साडेपाचच्या सुमारास तीन मुखवटेधारी हल्लेखोर…

या गँगचा लीडर हिमांशू भाऊ हा पोर्तुगालमध्ये पळून गेलेला गुन्हेगार असल्याचे सांगितले जाते. याच गँगने जुलै महिन्यात गायक-रॅपर राहुल फाजीलपूरियाच्या कारवर झालेल्या गोळीबाराचीही जबाबदारी घेतली होती. दरम्यान, गुरुग्राम पोलिसांच्या माहितीनुसार आज (रविवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास तीन मुखवटेधारी हल्लेखोर मोटारसायकलवर आले आणि यादवच्या सेक्टर 57 मधील घराबाहेर तब्बल 25 ते 30 गोळ्या झाडल्या. या गोळ्या घराच्या खालच्या मजल्यावर व पहिल्या मजल्यावर लागल्या. काचेच्या खिडक्या-दारांना चिरा पडल्या. सुदैवाने, यादव हे हल्ल्यावेळी घरी नव्हते. त्याचे वडील आणि काही कुटुंबीय मात्र घरात होते, परंतु कोणीही जखमी झाले नाही.

एल्विश सध्या कामानिमित्त शहराबाहेर

यादवच्या वडिलांनी सांगितले की, “आम्ही झोपलो असताना तीन लोक आले. एक बाइकवर बसला होता, तर दोघे खाली उतरून गोळीबार करू लागले. त्यांनी 25 ते 30 राऊंड झाडले आणि पळून गेले. याआधी आम्हाला कोणतीही धमकी मिळालेली नव्हती. एल्विश सध्या कामानिमित्त शहराबाहेर आहे.” पोलिसांनी घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे जमा केले असून, CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. औपचारिक तक्रार आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

एल्विश यादव कोन?

एल्विश यादव हा एक प्रसिद्ध युट्यूबर, कंटेंट क्रिएटर आणि गायक आहे. त्याचे कॉमेडी व्हिडिओ, व्लॉग आणि रोस्ट व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होतात. त्याचे खरे नाव सिद्धार्थ यादव आहे. एल्विशने 2016 मध्ये युट्यूबवर काम करण्यास सुरुवात केली आणि फेब्रुवारी 2018 पर्यंत दहा लाख सबस्क्राइबर्स मिळवले. आज त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 15 दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत, फेसबुकवर 4.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याने बिग बॉस ओटीटी 2 आणि लाफ्टर शेफ 2 हे शो जिंकले आहेत. त्याचे मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे.

आणखी वाचा

Comments are closed.