95 ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी मिशन बंधारे मोहीम, 500 पेक्षा अधिक बंधारे बांधण्याचे नियोजन

मिशन बंधारे उपक्रमातंर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून तालुकास्तरावर एकाच दिवशी २३ डिसेंबर २०२५ रोजी ९५ ग्रामपंचायतीमध्ये मिशन बंधारे मोहीम राबविण्यात येणार आहे. एकाच दिवशी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेमध्ये विजय, वनराई, कच्चे बंधारे बांधले जाणार आहेत. जवळपास ५०० पेक्षा अधिक बंधारे बांधण्याचे नियोजन असून, मिशन बंधारे मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गट विकास अधिकारी चेतन शेळके यांनी केले आहे.
या मोहिमेच्या नियोजन संदर्भातील बैठक नुकतीच पंचायत समितीस्तरावर पार पडली असून या मोहिमेतंर्गत एकाच दिवशी ५०० हुन अधिक बंधारे बांधले जाणार आहेत. या मोहिमेसाठी ग्रामपंचायत पातळीवर अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद गटनिहाय संपर्क अधिकारी व पंचायत समिती निहाय ग्रामपंचायत संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करणेत आली आहे. यामध्ये गट विकास अधिकारी, पंचायत समिती तालुकास्तरीय अधिकारी यांचा समावेश आहे. प्रत्येक पथकामध्ये विस्तार अधिकारी (कृषी, ग्रा.पं. सांख्यिकी, शिक्षण) केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, तालुका अभियान व्यवस्थापक (एमएसआरएलएम) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
श्रमदान तसेच लोकसहभागातून ही मोहिम राबविली जाणार आहे त्यामध्ये ग्रामपंचायत पातळीवरील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व तसेच उमेद समूहातील महिला बचतगट, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.

Comments are closed.