फलटणमध्ये पालखी मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम फलटण नगरपालिकेने वेगाने आणि धडकपणे सुरू केली आहे. शहरातील शेवटचे अतिक्रमण जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत ही मोहीम अविरत सुरूच राहणार, असा ठाम निर्धार फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. या धडक मोहिमेचे शहरातील सुजाण नागरिकांकडून ठिकठिकाणी जोरदार स्वागत होत आहे.
पालखी मार्गावरील या कारवाईबाबत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पालिकेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, अतिक्रमण काढताना कोणताही छोटा-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही. अगदी आमचे स्वतःचे जरी अतिक्रमण समोर आले, तरी ते सर्वांत आधी प्राधान्याने काढले जाईल. कायद्यासमोर सर्व समान असून, पालखी मार्ग मोकळा करणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे.
फलटणचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या थेट देखरेखीखाली मोहीम सुरू आहे. मुख्याधिकाऱ्यांनी नेमलेले प्राधिकृत अधिकारी, पालिकेचे कर्मचारी आणि कडक पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत दररोज वेगवेगळ्या भागांतील बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे जमीनदोस्त केली जात आहेत.
पालखी मार्ग सुंदर, स्वच्छ, प्रशस्त आणि पूर्णपणे अतिक्रमणमुक्त बनविण्याचा आमचा निर्धार आहे. वारीसाठी येणाऱ्या लाखो वैष्णवांना आणि फलटणकरांना याचा मोठा फायदा होईल, असे फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले.
Comments are closed.