मुंबईतील 2011 नंतरच्या अतिक्रमणांवर हातोडा; दीड महिन्यात अ‍ॅक्शन प्लॅन बनवण्याचे म्हाडा, एसआरए, कलेक्टरना निर्देश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईतील 2011 नंतर झालेल्या अतिक्रमणांवर लवकरच हातोडा पडणार आहे. सॅटेलाईट मॅपिंगच्या आधारे ही अतिक्रमणे शोधून काढली गेली आहेत. आता त्यांच्यावर कोणत्या पद्धतीने आणि कधी कारवाई करायची त्याचा ठोस आराखडा एप्रिलअखेरपर्यंत सादर करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी आज दिले.

आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात बैठक झाली. या बैठकीत सन 2000 ते 2011 ते 2025 या कालावधीत मुंबईत उभ्या आणि आडव्या स्वरूपात झालेल्या अतिक्रमणांचा आढावा घेण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे, वाढीव मजले निदर्शनास आले. या अतिक्रमणांचे मॅपिंग करून हा कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

मुंबईतील नाले, नद्या आणि मोकळी जमीन अतिक्रमणमुक्त केल्याशिवाय शहराचा शाश्वत विकास शक्य नाही. त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून अतिक्रमणांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यासाठी विस्तृत आराखडा सादर करावा, अशा सूचना आशीष शेलार यांनी दिल्या आहेत. त्यानंतर तो आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवून पुढील कारवाई केली जाणार आहे. या बैठकीस आमदार मिहिर कोटेचा, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्हाडा मुंबईचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर उपस्थित होते.

अतिक्रमणे ओळखण्यासाठी ‘नेत्रम’ या प्रणालीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सॅटेलाईट मॅपिंग, ड्रोन सर्व्हे आणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून मुंबईतील अतिक्रमणांची माहिती संकलित करण्यावरही भर देण्यात आला आहे.

Comments are closed.