प्रवरा रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या, प्रवरा इन्स्टिटय़ूटचे अधिकृत निवेदन

अहिल्यानगर राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर विनोद कुमार गौड (वय 30) यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. राहाता तालुक्यामध्ये लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयामध्ये मूळ तेलंगणा येथील रहिवासी असलेले विनोद कुमार हे प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करत नातेवाईकांना खबर दिली होती. त्यानुसार शवविच्छेदन केल्यानंतर विनोदकुमार यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती लोणी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वाघ यांनी दिली आहे. दरम्यान, या आत्महत्येनंतर अहिल्यानगर जिह्यात उलटसुलट चर्चा सुरू होती.
n प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणी प्रवरा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांनी आज अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून डॉ. विनोद कुमार गौड यांच्या निधनाबाबत संवेदना व्यक्त केल्या. तसेच याप्रकरणी तातडीने चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, चौकशीचा अहवाल येईपर्यंत बालरोग विभागप्रमुखांना निलंबित करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, घटनेनंतर सोशल मीडियावर विविध संदेश प्रसारित होत आहेत; परंतु अप्रमाणित आरोप पसरवू नयेत किंवा अकाली निष्कर्ष काढू नयेत, अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर संस्थेचे रजिस्ट्रार तसेच डॉ. बाळासाहेब विखे-पाटील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय लोणीचे डीन यांनी स्वाक्षरी केली आहे.
Comments are closed.