लॉर्ड्स कसोटी रोमांचक वळणावर; न्यूझीलंडसमोर 218 धावांचे लक्ष्य, इंग्लंडला विजयासाठी 7 बळींची गरज

लॉर्ड्सवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली कसोटी सामना केवळ दोन दिवसांच्या खेळानंतर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. तिसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला नाही, तर सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. दिवसभरात एकूण 17 बळी पडले.

दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 113 धावांवर आटोपल्यानंतर, इंग्लंडने 27 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव 226 धावांवर संपला आणि त्यांनी न्यूझीलंडसमोर विजयासाठी 254 धावांचे लक्ष्य ठेवले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 3 बाद 36 अशी होती. त्यांना विजयासाठी आणखी 218 धावांची गरज आहे, तर इंग्लंडला ७ बळी घ्यावे लागतील.

254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या पहिल्याच षटकात गस ॲटकिन्सनने कर्णधार टॉम लॅथमला शून्यावर बाद केले. त्यानंतर, जोश टोंगने केन विल्यमसनला 18 धावांवर माघारी धाडले.

दिवसाचा खेळ संपायला थोडाच वेळ बाकी असताना न्यूझीलंडने विल्यम ओ’रुर्कला ‘नाईटवॉचमन’ म्हणून पाठवले, परंतु तोही शून्यावर बाद झाला. ॲटकिन्सनने त्याला त्रिफळाचीत केले, त्यासोबतच दिवसाचा खेळही संपला. तिसऱ्या दिवशी डेव्हन कॉनवे (12 धावांवर नाबाद) आणि रचिन रवींद्र फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.

दिवसाच्या तिसऱ्या सत्रात इंग्लंडचा दुसरा डाव 226 धावांवर संपला. बेन डकेट आणि एमिलिओ गे यांनी पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. डकेट 33 धावांवर बाद झाला.

त्यानंतर, एमिलिओ गे आणि बेथेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. बेथेल 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर, जो रूट आणि एमिलिओ गे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 27 धावांची भर घातली; गे 57 धावांवर बाद झाला.

3 बाद 126 अशा स्थितीत असताना इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; 127 धावांवर त्यांनी आणखी तीन बळी गमावले. त्यानंतर गस ॲटकिन्सन आणि यष्टिरक्षक जेमी स्मिथ यांनी सातव्या विकेटसाठी 57 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ॲटकिन्सन 14 धावांवर बाद झाला, तर जेमी स्मिथने 39 धावांचे योगदान दिले. अखेरीस, इंग्लंडचा संपूर्ण संघ 226 धावांत बाद झाला.

न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज नॅथन स्मिथने उत्कृष्ट गोलंदाजी करत 17 षटकांत 70 धावा देऊन 6 बळी टिपले. विल ओ’रूर्केने 2 बळी घेतले, तर काईल जेमिसन आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

यापूर्वी, न्यूझीलंडचा पहिला डाव 113 धावांत आटोपला होता, ज्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावाच्या आधारे 27 धावांची आघाडी मिळाली होती. इंग्लंडचा स्वतःचा पहिला डाव सामन्याच्या पहिल्या दिवशी 140 धावांवर संपला होता.

पहिल्या डावातील 27 धावांच्या आघाडीच्या जोरावर, इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी न्यूझीलंडकडे तिसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ उपलब्ध आहे. तिसऱ्या दिवशी कोण बाजी मारणार, याकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.