जो रूटची दमदार सेंच्युरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन-कोहलीपासून किती शतके दूर?
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट सध्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. कसोटी क्रिकेटनंतर आता वनडेमध्येही तो सातत्याने नवनवे विक्रम रचताना दिसतो आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात जो रूटने आणखी एक शानदार शतक झळकावत आपल्या कारकिर्दीतील मोठा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे हे शतक त्याने अत्यंत संथ आणि फलंदाजीसाठी अवघड मानल्या जाणाऱ्या खेळपट्टीवर साकारले.
श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात जो रूटने अप्रतिम फलंदाजी करत नाबाद 111 धावांची खेळी केली. त्याने 108 चेंडूंमध्ये ही शतकी खेळी साकारली. या दरम्यान त्याने 9 चौकार आणि 1 शानदार षटकार मारला, या शतकासह जो रूटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण शतकांची संख्या 61 वर पोहोचली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम अजूनही ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 100 शतके झळकावली आहेत. त्याच्यानंतर विराट कोहली (85), रिकी पॉन्टिंग (71), कुमार संगकारा (63) आणि जॅक कॅलिस (62) यांचा नंबर लागतो. आता 61 शतकांसह जो रूट या यादीत पुढे आला आहे. मात्र सचिनच्या तुलनेत तो अजून 39, तर विराट कोहलीच्या तुलनेत 24 शतकांनी मागे आहे.
वनडे क्रिकेटमध्ये हे जो रूटचं 20वं शतक ठरलं. या शतकासह त्याने पाकिस्तानच्या सईद अन्वर आणि बाबर आजम यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. वनडेमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहली (53) याच्या नावावर असून सचिन तेंडुलकर 49 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
श्रीलंकेत खेळताना जो रूटने आपल्या कारकिर्दीतील पाचवं शतक झळकावलं. यासह त्याने शिखर धवन आणि वीरेंद्र सेहवाग (4-4 शतके) यांना मागे टाकले. या बाबतीत फक्त सचिन तेंडुलकर (9) आणि विराट कोहली (6) हेच त्याच्या पुढे आहेत.
Comments are closed.