विंडीजचा इंग्लंडला धक्का
शरफेन रदरफर्डने 7 षटकार आणि 2 चौकारांसह केलेल्या 76 धावा आणि जेसन होल्डरच्या 4 षटकारांच्या 33 धावांच्या झंझावाताने वेस्ट इंडीजला नकळतपणे 196 धावांवर पोहोचवले आणि याच वाढलेल्या धावा त्यांना इंग्लंडविरुद्ध 30 धावांनी विजय मिळवून देणाऱया ठरल्या. सलग दुसऱया विजयामुळे वेस्ट इंडीजने आपल्या सुपर एटचा दावा अधिक मजबूत केला आहे. आता त्यांना नेपाळविरुद्ध विजय मिळवत सुपर एटवर शिक्कामोर्तब करणे सोपे जाईल.
ब्रॅण्डन किंग (0) आणि कर्णधार शाय होप (1) यांच्या अपयशानंतर शिमरॉन हेटमायर आणि रोस्टन चेस विंडीजचा धावफलक शंभरीकडे घेऊन गेले, पण संघाला द्विशतकाकडे झेप घेण्याची किमया रदरफर्ड आणि होल्डरने केली. दोघांनी 5 षटकांत 61 धावांची भागी रचली. ही भागीदारी महत्त्वाची ठरली. विंडीजच्या 197 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला फिल सॉल्ट (30), जोस बटलर (21) आणि जेकब बेथेल (33) यांनी संघाला 8 षटकांतच 85 धावांपर्यंत नेले. मात्र आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर इंग्लंडची धावगती मंदावली. ती वाढवण्यासाठी सॅम करनने (ना. 43) शेवटपर्यंत संघर्ष केला, पण ते विजयापासून दुरावत गेले आणि अखेर 166 धावांवर त्यांचा संघ बाद झाला.
Comments are closed.