नेपाळसाठी अजूनही संधी! ‘असं’ आहे सुपर-8 मध्ये पोहोचण्याचं गणित

च्या१२ फेब्रुवारी रोजी नेपाळ आणि इटली यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात इटलीने नेपाळचा १० गडी राखून पराभव करत सर्वांना चकित केले. याआधी नेपाळने इंग्लंडला कडवी झुंज दिली होती, मात्र त्यांना केवळ ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडनंतर आता इटलीविरुद्ध नेपाळला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. असे असले तरी, सलग दोन पराभवांनंतरही नेपाळचा ‘सुपर-८’ मध्ये पोहोचण्याचा मार्ग अजूनही मोकळा आहे. जाणून घेऊया काय आहे नेपाळच्या पात्रतेचे समीकरण.

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये नेपाळ संघ ‘ग्रुप C’ मध्ये आहे. सध्या नेपाळचे खाते उघडले नसल्याने ते शून्य गुणांसह पाचव्या (शेवटच्या) स्थानावर आहेत. परंतु, संघ अजूनही सुपर-८ साठी पात्र ठरू शकतो. सध्या वेस्ट इंडिज ४ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर स्कॉटलंड, इटली आणि इंग्लंड प्रत्येकी २ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. अशा परिस्थितीत नेपाळला सुपर-८ मध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. याशिवाय, नेपाळला गुणतालिकेतील इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. थोडक्यात, नेपाळ अजूनही मोठा उलटफेर करून सुपर-८ मध्ये प्रवेश करू शकतो.

​या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करताना १९.३ षटकांत १२३ धावा केल्या होत्या. नेपाळकडून आरिफ शेखने २४ चेंडूत २७ धावांची खेळी केली. याशिवाय आसिफ शेखने २० चेंडूत २० धावा केल्या, तर कर्णधार रोहित पौडेलने १४ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले. १२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इटलीने अवघ्या १२.४ षटकांत एकही गडी न गमावता १२४ धावा पूर्ण केल्या आणि १० गडी राखून मोठा विजय नोंदवला.

Comments are closed.