इंग्लंडने टी20 वर्ल्ड कपसाठी केला संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी!
इंग्लंडने टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आपला तात्पुरता (Provisional) संघ जाहीर केला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला संघात स्थान देण्यात आले आहे, तर संघाची धुरा हॅरी ब्रूक याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. वर्ल्ड कपसोबतच श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आली आहे.
ॲशेस मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या जोश टंग याला पहिल्यांदाच टी20 संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय टॉम बँटन आणि विल जॅक्स यांच्यावरही निवडकर्त्यांनी विश्वास दाखवला आहे. इंग्लंडने टी20 वर्ल्ड कप आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडताना काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जोफ्रा आर्चरला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर ब्रायडन कार्स याला वर्ल्ड कप संघात स्थान मिळालेले नाही. जॅकब बेथेल आणि बेन डकेट यांना संघात सामील करून निवडकर्त्यांनी त्यांच्यावर भरवसा कायम ठेवला आहे.
न्यूझीलंडविरुद्धची मालिका न खेळू शकलेल्या विल जॅक्सचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच, मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात पाच बळी घेणाऱ्या जोश टंगला पहिल्यांदाच टी20 संघात संधी मिळाली आहे. जेमी ओव्हरटन यालाही संघात स्थान मिळाले आहे, मात्र मार्क वुड पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला संघात स्थान मिळवता आले नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही इंग्लंडचा संघ जाहीर झाला आहे. टॉम बँटन वनडे संघातही आपले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. डिसेंबर 2023 नंतर जॅक क्राउली याचे पहिल्यांदाच वनडे संघात पुनरागमन झाले आहे. विल जॅक्सला वनडेमध्येही आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ल्यूक वुड याला टी20 वर्ल्ड कपसोबतच वनडे संघातही स्थान मिळाले आहे.
Comments are closed.