नाद करतो काय..! इंग्लंड क्रिकेट संघाने रचला विश्वविक्रम..!! 20 षटकात केल्या 300+ धावा..

हॅरी ब्रुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंड क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 300 धावांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला. कोणत्याही पूर्ण सदस्य संघाविरुद्ध 300 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्याआधी 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताने 297 धावा केल्या होत्या. पण टीम इंडियाला हा टप्पा गाठता आला नाही. त्याच वेळी, टी20 क्रिकेटच्या इतिहासातील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने फिल साल्टच्या झंझावाती शतकाच्या जोरावर 2 विकेट गमावत 304 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात संपूर्ण दक्षिण आफ्रिकेचा संघ 158 धावांवर गारद झाला.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना, इंग्लंडने धमाकेदार कामगिरी केली. फिल साॅल्ट आणि जोस बटलरच्या सलामी जोडीने पहिल्या 10 षटकात 100 धावांचा टप्पा ओलांडला. बटलर 30 चेंडूत 83 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. बटलर बाद झाल्यानंतरही, सॉल्टने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही आणि तो एका टोकावरून चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत राहिला.

सॉल्टने 60 चेंडूत 15 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकारांसह 141 धावांची नाबाद खेळी केली, तर जेकब बेथेलने 26 आणि कर्णधार हॅरी ब्रूकने नाबाद 41 धावा केल्या.

पूर्ण सदस्य संघाविरुद्ध टी20 मधील सर्वोच्च धावसंख्या

304/2 इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मँचेस्टर 2025
297/6 बांगलादेश हैदराबाद विरुद्ध भारत 2024
283/1 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग 2024
278/3 अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड डेहराडून 2019
267/3 इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज तरौबा 2023

टी20 क्रिकेटच्या इतिहासात ही फक्त तिसरी वेळ आहे जेव्हा एखाद्या संघाने 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. इंग्लंडपूर्वी, झिम्बाब्वे आणि नेपाळ संघांनी ही कामगिरी केली आहे.

टी२० सामन्यांमधील सर्वाधिक धावसंख्या

344/4 झिम्बाब्वे विरुद्ध गांबिया, नैरोबी 2024
314/3 नेपाळ विरुद्ध मंगोलिया, हांग्जो 2023
304/2 इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मँचेस्टर 2025

305 धावांच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका पूर्ण 20 षटकेही खेळू शकली नाही. दक्षिण आफ्रिका 16.1 षटकांत 158 धावांतच गारद झाला. इंग्लंडने 146 धावांच्या फरकाने सामना जिंकला, जो इंग्लंडचा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात मोठा विजय आणि दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा पराभव आहे.

Comments are closed.