इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्ध पेटले! इंग्लंड-पाकिस्तान सामना रद्द, हॉटेलमध्येच थांबले संघ

इंग्लंड लायन्स विरुद्ध पाकिस्तान शाहीन : अबू धाबीमध्ये होणारा पाकिस्तान शाहीन आणि इंग्लंड लॉयन्स यांच्यातील दुसरा अनऑफिशियल वनडे सामना सुरक्षा कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे. हा सामना 1 मार्च 2026 रोजी अबू धाबीतील ओव्हल स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. मात्र मिडल ईस्टमध्ये वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे तो आयोजित करता आला नाही.

इराण-इस्त्रायल युद्ध (Israel Vs Iran War)

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर इराणकडून झालेल्या प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ल्यांचा परिणाम संयुक्त अरब अमिरात (UAE)सह संपूर्ण मिडल ईस्टमध्ये जाणवू लागला आहे. दुबई आणि अबू धाबीमध्ये स्फोटांच्या घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या असून, त्यानंतर हवाई वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

सामना रद्द करण्याचा निर्णय

या पार्श्वभूमीवर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB)ने सुरक्षा तज्ज्ञ आणि सरकारी सल्ल्यानुसार सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे ECBने स्पष्ट केले आहे. दोन्ही संघांतील खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी यांना हॉटेलमध्येच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणतेही सराव सत्रही पार पडलेले नाही. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, मिडल ईस्टमधील हवाई क्षेत्र पुन्हा खुले झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

पाच सामन्यांची मालिका…

ही पाच सामन्यांची 50 षटकांची मालिका आहे आणि हा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यात इंग्लंड लॉयन्सने पाकिस्तान शाहीनचा 9 गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यात पाकिस्तान शाहीनने प्रथम फलंदाजी करत 152 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने हे लक्ष्य सहज गाठले होते. यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतही इंग्लंडने 3-0 अशी मालिका जिंकली होती. इंग्लंडचा हा दौरा 9 मार्चपर्यंत नियोजित होता, मात्र सध्याच्या परिस्थितीत मालिका रद्द होणार की पुढे ढकलली जाणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

या संकटाचा परिणाम इतर नियोजित मालिकांवरही होऊ शकतो. इंग्लंड महिला संघाचे अबू धाबी येथे होणारे प्रशिक्षण शिबिर पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच UAEमध्ये 13 मार्चपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तान-श्रीलंका टी-20 आणि वनडे मालिकेवरही अनिश्चिततेचे सावट आहे. दोन्ही क्रिकेट बोर्ड सुरक्षा लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा –

IND vs WI Live Update : एकच तिकीट, दोन दावेदार! ‘क्वार्टर फायनल’मध्ये भारत-वेस्ट इंडिजमध्ये आरपारची लढत

आणखी वाचा

Comments are closed.