विजयाचं समीकरण ठरलं, सेमीफायनलचं रणशिंग फुंकलं; इंग्लंडशी भिडणार टीम इंडिया… अट फक्त एकच
T20 विश्वचषक 2026 सेमीफायनल परिस्थिती : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026चा थरार आता शिगेला पोहोचला आहे. क्रिकेटप्रेमींचा श्वास रोखून धरणाऱ्या या स्पर्धेत 27 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे न्यूजीलंड आणि इंग्लंड यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने चार विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. या विजयासह उपांत्य फेरीत कोणत्या चार संघांचा प्रवेश होणार, हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे, तर भारतीय संघाची संभाव्य लढत कोणासोबत होणार, याचाही अंदाज बांधला जात आहे.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेची उपांत्य फेरीत एन्ट्री
स्पर्धेतील 49 सामने पूर्ण झाल्यानंतर दोन संघांचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिका तर दुसऱ्या गटातून इंग्लंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूजीलंडच्याही उपांत्य फेरीतील स्थानाची शक्यता प्रबळ मानली जात आहे. इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करला असला तरी गुणतालिकेत त्यांचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड आहे.
पाकिस्तान उपांत्य फेरी गाठायची असेल, तर त्यांना उरलेल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध केवळ विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. पाकिस्तानने श्रीलंकेला 64 धावांनी पराभूत करणे किंवा लक्ष्याचा पाठलाग करताना 13.1 षटकांत सामना जिंकणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचा स्पर्धेतील प्रवास इथेच थांबेल.
भारताची इंग्लंडशी संभाव्य लढत?
पहिल्या गटात दक्षिण आफ्रिकेचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे. त्यांच्या सध्याच्या फॉर्मकडे पाहता हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी अवघड नसल्याचे दिसते. दुसरीकडे, भारताची लढत वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. वेस्ट इंडिजने स्पर्धेत काही सामने गाजवले असले तरी बलाढ्य संघांविरुद्ध त्यांची कामगिरी विशेष ठरलेली नाही. शिवाय टी-20 प्रकारात भारताविरुद्ध त्यांचा रेकॉर्डही खास नाही. त्यामुळे क्रिकेट तज्ज्ञ भारतालाच या सामन्यात आघाडीवर मानत आहेत.
‘सुपर-8’ फेरीचा संभाव्य शेवट
जर अपेक्षित निकाल लागले, तर पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर आणि भारत दुसऱ्या स्थानावर उपांत्य फेरीत दाखल होतील. दुसऱ्या गटातून इंग्लंडने आधीच अव्वल स्थान पक्के केले असून न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता अधिक आहे.
उपांत्य फेरीतील संभाव्य सामने
स्पर्धेच्या नियमानुसार, गट 1 मधील अव्वल संघाचा सामना गट 2 मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होईल, तर गट 1 मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ गट 2 मधील अव्वल संघाशी भिडेल. त्यामुळे उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सामना न्यूझीलंडशी, तर इंग्लंडचा सामना भारताशी होण्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.