PAK vs ENG: सुपर-8 मध्ये पाकिस्तान आता इंग्लंडशी भिडणार! जाणून घ्या पाऊस पुन्हा खोडा घालणार का?

टी-20 विश्वचषक 2026 (icc T20 international world cup 2026) मधील सुपर-8 फेरीत आता पाकिस्तानचा सामना इंग्लंडशी (PAK vs ENG) होणार आहे. श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे होणारा हा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या सामन्यातील पराभव त्यांचे सेमीफायनलचे स्वप्न संपवू शकतो.

न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तानला आता उरलेले दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. इंग्लंडचा संघ सध्या फॉर्मात असून त्यांनी श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर इंग्लंडचे कठीण आव्हान असेल.

पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने चाहत्यांच्या मनात धाकधूक होती, पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी हवामानाचा अंदाज दिलासादायक आहे. 24 फेब्रुवारी रोजी पल्लेकेलेमध्ये पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी (फक्त 5 ते 6 टक्के) आहे. तसेच कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. आर्द्रतेचे प्रमाण 78 टक्क्यांपर्यंत असू शकते, ज्यामुळे खेळाडूंना उकाड्याचा त्रास होऊ शकतो. एकूणच, हा सामना कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्याची शक्यता आहे.

भारताविरुद्धचा सामना वगळता पाकिस्तानने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्याने त्यांचे गुण विभागले गेले आहेत. आता सेमीफायनल गाठण्यासाठी त्यांना इंग्लंडला हरवावेच लागेल.

Comments are closed.