Environment minister pankaja munde announced to make a comprehensive plan for recycling of polluted water in marathi
मुंबई : नद्या, तलाव यांच्या प्रवाहात सांडपाणी मिसळू नये, सांडपाण्याचा पुनर्वापर करता यावा यासाठी पर्यावरण विभाग सर्व समावेशक आराखडा बनवणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज केली. तसेच नद्यांच्या काठावरील ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात प्रदूषण नियंत्रण नियंत्रणासाठी, प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आय.आय.टी. पवई येथे पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आय.आय.टी. पवई यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि शाश्वत उपाययोजना या विषयावर एक दिवसाची परिषद आयोजित करण्यात आली होती, या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. (environment minister pankaja munde announced to make a comprehensive plan for recycling of polluted water)
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका या क्षेत्रातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या-त्या स्थानिक भागातील प्रदूषित पाणी थेट मिसळले जाते. प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रदूषित पाणी थेट पाण्याच्या प्रवाहामध्ये मिसळू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नद्या आणि तलावांचे संवर्धन ही भविष्याची गरज ओळखून त्याचा नियोजित तांत्रिक आराखडा पर्यावरण विभागाकडून बनवला जाणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये लोकांना नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान माहिती होण्यासाठी पर्यावरण विभाग एक तांत्रिक कक्ष देखील स्थापन करून करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशिक्षण देणार आहे. जेणेकरून प्रदूषणाच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवता येतील असेही त्या म्हणाल्या.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, शेतीमध्ये पिकांवर फवारणी करण्यात येणारी कीटकनाशके यामुळे देखील पाणी प्रदूषित होत आहे. जल, वायू, मृदा प्रदूषण रोखण्यासाठी परस्पर संबंधित शासनाच्या विभागांच्या समन्वयाने प्रदूषण टाळण्यासाठी काटेकोरपणे उपायोजना करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आवश्यक तिथे जनजागृती करणे. कायद्याची गरज भासल्यास कायदेशीरदृष्ट्या कारवाई करणे, त्याचप्रमाणे कायदा आणि नियमांची माहिती लोकांना करून देणे यासाठी देखील पर्यावरण विभाग भर देणार आहे.
पर्यावरणावर प्रेम करणारी आपली संस्कृती आहे. ही संस्कृती जपण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.प्रत्येकाने हे प्रदूषण रोखण्यासाठी काळाची गरज ओळखून आत्तापासूनच काम केले तर आपण पुढील पिढीला आपण चांगले वातावरण आणि चांगले आरोग्य देऊ शकतो. पर्यावरणासाठी काम करून आपण सर्वांचे जीवन सुसह्य करणार आहोत त्यामुळे या कार्यशाळेचा नक्कीच सर्वांना लाभ होईल असेही त्या म्हणाल्या.
प्रधान सचिव के. एच. गोविंदराज म्हणाले की, पाणी ही दुर्मिळ होत चाललेली संपदा आहे. शहरामध्ये निर्माण होणारे सांडपाणी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या स्तोत्रात मिसळले जाते.मात्र प्रदूषित झालेल्या सांड पाण्याचा जर आपण त्याच ठिकाणी पुनर्वापर केला तर प्रदूषणाची समस्या सुटण्यासाठी मदत होऊ शकेल. आपल्याला प्रदूषणाची वस्तुस्थिती माहिती आहे आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ही माहिती आहेत. शासनाच्या प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याने या समस्यावर मात करण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवणे. स्थानिक ठिकाणी प्रदूषण कमी होण्यासाठी जनजागृती करणे यासारखे उपाय करणे गरजेचे आहे.
हेही वाचा – IAS Transfer : प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरूच, मंतदा राजा दयानिधी सिडकोचे सहव्यवस्थापक
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी महाराष्ट्रातील पालिका क्षेत्रातील प्रदूषित पाण्याचे सद्यस्थिती आणि त्याचा होणारा परिणाम याविषयी सादरीकरण केले.
Comments are closed.