अरुणाचल प्रदेशात हेरगिरीचे जाळे उघडकीस आले.
पाकिस्तानी कनेक्शनही सापडले : सीमावर्ती भागात चीनच्या हालचालींवरही देखरेख
सर्कल/ इटानगर
अरुणाचल प्रदेशात हेरगिरी नेटवर्क आणि सीमापार घुसखोरीसंबंधी कारवाया उघडकीस आल्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. गेल्या 10 दिवसांत पोलिसांनी पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कच्या चार संशयितांना अटक केली आहे. याचदरम्यान, स्थानिकांनी वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) चिनी सैन्याची उपस्थिती आणि संभाव्य घुसखोरीची तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले आरोपी पाकिस्तानी हँडलर्सना लष्करी कारवाया आणि इतर संवेदनशील माहिती प्रसारित करत होते. सुरुवातीच्या तपासात या नेटवर्कचे चीनशी संबंध असल्याचे संकेतही समोर आले आहेत.
सीमावर्ती भागात सुरू असलेल्या या कारवायांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा तज्ञ याला ‘हायब्रिड वॉरफेअर’च्या रणनीतीशी जोडत आहेत. या कुरापतींमध्ये हेरगिरी, घुसखोरी आणि लष्करी दबाव यांचा समावेश आहे. हेरगिरी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री मामा नातुंग यांनी सांगितले. दरम्यान, तिबेटमधील लुंजे एअरबेसवरही चिनी कारवायांवर लक्ष ठेवले जात आहे. मॅकमोहन रेषेपासून सुमारे 40 किमी अंतरावर 36 हार्डनाइज्ड एअरक्राफ्ट शेल्टर बांधणे आणि स्टेल्थ जेट्स तैनात करणे याबद्दल माहिती समोर आली आहे.
स्लीपर सेल स्थापन केल्याचा संशय
अटक केलेल्या संशयितांनी स्थानिक मुस्लीम समुदायांमध्ये मिसळून स्लीपर सेल विकसित करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. काही बांगलादेशी तरुणांची भूमिका देखील संशयास्पद आहे. हे प्रकरण आसाम आणि अरुणाचल प्रदेशशी जोडलेल्या मोठ्या हेरगिरी मॉड्यूलचा भाग असू शकते, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.