घटनात्मक सुधारणांसाठी 'जेपीसी'ची स्थापना
अपराजिता सारंगी यांच्याकडे नेतृत्त्व : समितीत राहणार एकंदर 31 सदस्य : समिती बनविणार एक संतुलित अहवाल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या संसदेने 130 व्या घटनासुधारणेसंबंधीच्या विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त सांसदीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा सदस्या अपराजिता सारंगी यांना देण्यात आले आहे. या समितीत एकंदर 31 सदस्य राहणार असून त्यांच्यापैकी 21 लोकसभेचे, तर 10 सदस्य राज्यसभेचे असतील, अशी माहिती देण्यात आली.
केंद्र सरकारने 130 वे घटनासुधारणा विधेयक संसदेत सादर केले आहे. गंभीर अपराधिक आरोप असणाऱ्या जनप्रतिनिधींना अपात्र ठरविण्याविषयीचे हे विधेयक आहे. हे विधेयक मागच्या अधिवेशनात सादर करण्यात आले होते. ते संयुक्त सांसदीय समितीकडे सोपविले जाईल, अशी घोषणा त्यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली होती. आता या सांसदीय समितीची स्थापना झाली आहे.
समितीची कार्यकक्षा
ही समिती 130 व्या घटना सुधारणा विधेयकावर विस्तृत विचार करणार आहे. या विधेयकातील प्रावधाने, त्यांची घटनात्मकता, या प्रावधानांचा परिणाम, भ्रष्टाचारमुक्त कायदा व्यवस्थेसाठी काय केले पाहिजे, इत्यादी मुद्द्यांवर समितीच्या बैठकांमध्ये सविस्तर विचारमंथन होणार आहे. या संदर्भांमध्ये समिती कायदेतज्ञ, घटनातज्ञ आणि इतर मान्यवर यांच्याशी चर्चा करणार असून त्यांचा परामर्ष घेणार आहे. समिती एक संतुलित अहवाल बनविणार असून तो नंतर लोकसभेत आणि राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर या विधेयकावर संसदेत चर्चा आणि मतदान होणार असून विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये किमान दोन तृतियांश मतांनी संमत झाल्यास, त्याचे कायद्यात रुपांतर केले जाणार आहे.
भविष्यकाळासाठी आवश्यक
हे विधेकय 2025 मधील सर्वात महत्वाचे विधेयक आहे, अशी तज्ञांची मान्यता आहे. या विधेयकाचे भविष्यात दूरगामी परिणाम संभवतात. हे विधेयक संसद सदस्य आणि लोकप्रतिनिधींचे उत्तरदायित्व वाढविणार असून त्यांना भ्रष्टाचारमुक्त वर्तणुकीसाठी उद्युक्त करणारे आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
प्रमुख सदस्यांची नावे
या समितीत रविशंकर प्रसाद, भार्तृहरी महताब, अनुराग ठाकूर, विष्णू दयाळ राम, डी. के. अरुणा, पुरुषोत्तम रुपाला, सुप्रिया सुळे, असदुद्दिन ओवैसी आणि हरसिमरत कौर बादल हे लोकसभेचे महत्वाचे सदस्य आहेत. तर वृजलाल, उज्ज्वल निकम, नबाम रेबिया, नीरज शेखर, मनन कुमार मिश्रा, डॉ. के. लक्ष्मण आणि सुधा मूर्ती हे राज्यसभेचे सदस्य आहेत. हे विधेयक अत्यंत महत्वाचे आहे.
Comments are closed.