छोटी भूमिकाही चालेल, पण भूमिका दमदार हवी; ‘दामिनी’ फेम मीनाक्षी शेषाद्री 30 वर्षांनंतर पुन्हा चित्रपटसृष्टीत येण्यास उत्सुक
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री पुन्हा एकदा अभिनयविश्वात पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. जवळपास 30 वर्षांनंतर ती मुंबईत परतली असून आता चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार भूमिकांच्या शोधात आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांचे आभार मानले आणि पुन्हा कॅमेऱ्यासमोर येण्याची उत्सुकताही व्यक्त केली. ‘दामिनी’ ही मीनाक्षी शेषाद्रीचा गाजलेला चित्रपट होता. नुकतेच मीनाक्षीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हटले, “तुमच्या प्रेमासाठी, प्रोत्साहनासाठी आणि सातत्याने दिलेल्या पाठिंब्यासाठी मी मनापासून आभारी आहे. 30 वर्षांनंतर मी माझ्या मूळ गावी मुंबईत परतले आहे. सकारात्मक विचार आणि नव्या उत्साहासह मी पुन्हा मनोरंजन विश्वात पाऊल ठेवत आहे.”
भूमिकांबाबत बोलताना तिने स्पष्ट केले की, तिला केवळ मुख्य भूमिकाच नव्हे तर आशयघन आणि प्रभावी व्यक्तिरेखा साकारायच्या आहेत. “मुख्य भूमिका, सहाय्यक भूमिका किंवा छोटी भूमिका असो, ती सशक्त असणे महत्त्वाचे आहे. मला अशा भूमिका करायच्या आहेत ज्या एक कलाकार म्हणून मला आव्हान देतील,” असे ती म्हणाली. असे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.
दामिनी या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रिय झालेल्या मीनाक्षीने सांगितले की, गेल्या काही काळात तिला अनेक ऑफर्स मिळाल्या, मात्र काही भूमिका समाधानकारक नव्हत्या तर काही प्रकल्प पुढेच सरकले नाहीत. सध्या ती कोणत्याही पीआर किंवा टॅलेंट एजन्सीशिवाय स्वतः कामाच्या संधी शोधत आहे. तिने पुढे सांगितले, “मी इथे कोणालाही काही सिद्ध करण्यासाठी आलेली नाही. मला जे खरोखर आनंद देते तेच मी करत आहे. माझ्या कुटुंबाच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळेच मी हा निर्णय घेतला.” तसेच, हिंदुस्थानात राहत असली तरी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ती अधूनमधून अमेरिकेलाही जात असल्याचे तिने सांगितले.
शेवटी तिने चाहत्यांना प्रेम आणि पाठिंबा कायम ठेवण्याचे आवाहन केले. “तुमचा विश्वास आणि आशीर्वाद मला रोज पुढे जाण्याची प्रेरणा देतात,” असेही ती म्हणाली.
Comments are closed.