हे राम…. मृत्यूनंतरही डोंबिवलीतील खड्डे चुकले नाहीत, महाराष्ट्रनगरमधील रस्ता तीन महिन्यांपूर्वी खोदला; अंत्ययात्रेच्या वाटेत चिखलाचा राडारोडा

सुसंस्कृत नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये रस्त्यांची पुरती दुर्दशा झाली आहे. महाराष्ट्रनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी तीन महिन्यांपासून खोदून ठेवल्याने स्मशानभूमी अंत्ययात्रा घेऊन जाताना स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खोदकाम केलेल्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ठिकठिकाणी दलदल आणि चिखलाचा राडारोडा निर्माण झाला आहे. परिणामी या मार्गावर रुग्णवाहिकाही येत नाहीत. त्यामुळे हे राम, मृत्यूनंतरही खड्डे चुकले नाहीत, अशी संतप्त प्रक्रिया डोंबिवलीकरांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रनगरमध्ये काँक्रीटीकरणासाठी रस्ता खोदलेला आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचून चिखलाचा राडारोडा झाला आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे. महाराष्ट्रनगरमध्ये राहणारे तुषार गावडे यांच्या मातोश्री अर्चना गावडे यांचे निधन झाले. रुग्णवाहिका इमारतीपर्यंत न आल्याने मृताच्या नातेवाईकांना खड्डे आणि चिखल तुडवत अंत्ययात्रा काढावी लागली.

तातडीने काम करा, अन्यथा आंदोलन
महाराष्ट्रनगरमधील रस्ता बंद असल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामस्थांना उमेनगर, गरीबाचा वाडा, गोपीनाथ चौकातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रनगरमधील रस्त्याचे काम तातडीने करून नागरिकांची सुटका केली नाही तर पालिकेसमोर आंदोल न करू, असा इशारा ग्राहक संरक्षण कक्षाचे संघटक कैलास सणस यांनी दिला आहे.

Comments are closed.