करिअर संपलं तरी पुजारा अजूनही टीमसाठी सज्ज, कसोटी मालिकेबद्दल व्यक्त केली भावनिक आठवण!
टीम इंडियाची (Team india) भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रविवारी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहून निवृत्तीची घोषणा केली. पुजाराने आपला शेवटचा कसोटी सामना 2023 साली खेळला होता आणि तो बऱ्याच काळापासून टीमबाहेर होता.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पुजाराला पुन्हा टीममध्ये घेण्याची मागणी झाली होती. पण निवड समितीने तरुण खेळाडूंच्या बाजूने निर्णय घेतला. निवृत्ती घेतल्यानंतर पुजारा आता टीम इंडियासाठी एका नव्या भूमिकेत दिसण्याची इच्छा व्यक्त करतो आहे. एका मुलाखतीत त्याने अनेक मोठे खुलासे केले.
निवृत्तीनंतर रेवस्पोर्ट्सशी बोलताना पुजाराने भविष्यात टीम इंडियाचा कोच होण्याची इच्छा जाहीर केली. तो म्हणाला, हो, नक्कीच. खरं सांगायचं तर मी आतापर्यंत कोचिंगबद्दल काही गंभीरपणे विचार केला नाही. पण जर मला संधी मिळाली, तर मला खूप आनंद होईल. सध्या मी माझं मीडिया वर्क, कमेंट्री आणि अॅनालिसिस वर्क एन्जॉय करत आहे. मात्र, जसं मी आधीही म्हटलं, भविष्यात जर मला संधी मिळाली, तर मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
जेव्हा पुजाराला त्याच्या करिअरमधील आवडत्या सीरिज किंवा सामन्याबद्दल विचारलं गेलं, तेव्हा त्याने 2018 साली ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मिळालेल्या ऐतिहासिक कसोटी विजयाला सर्वात खास ठरवलं. तो म्हणाला, सर्वात आधी 2018 साली ऑस्ट्रेलियात मिळालेली कसोटी मालिका जिंकणं हा माझ्यासाठी सर्वात खास क्षण होता. 70 वर्षांहून अधिक काळानंतर पहिली कसोटी मालिका जिंकणं हे स्वतःमध्येच एक अविस्मरणीय क्षण होता.
यानंतर त्याने 2021 ची मालिकाही खास ठरवली. कारण त्या वेळी अनेक अडचणी, आव्हानं आणि महत्वाचे खेळाडू अनुपस्थित असतानाही भारताने ती मालिका जिंकली. पुजारा म्हणाला, “मी गाबा कसोटीचाही उल्लेख करेन, कारण तिथं परिस्थिती आपल्या बाजूने नव्हती. पण सर्वांनी अप्रतिम फलंदाजी करत टीमच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मला आनंद आहे की मी त्या मालिकेचा भाग होतो.
Comments are closed.