रोबोटसुद्धा 'आळशी' बनतात
बराच काळ काही काम न केल्यास आळशीपणा येतो, असा प्रत्येकाचा अनुभव आहे. मात्र, ही स्थिती केवळ माणसांचीच असावी, अशी आपली समजूत असेल तर ती अयोग्य आहे. बराच काळ काम न दिल्यास यंत्रमानवही आळशी होतात, असे दिसून आले आहे. वास्तविक यंत्रमानव माणसारखे काम करीत असले, तरी ते माणसाप्रमाणे सजीव नसून निर्जीव असतात. त्यामुळे त्यांचा वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत केला की ते पूर्ववत कामाला लागतात अशी अनेकांची समजूत आहे.
तथापि, तसे होत नाही. बराच काळ यंत्रमानवांना कामाविना नुसतेच ठेवल्यास त्यांना आळस येतो. त्यामुळे प्रदीर्घ काळाच्या अंतरानंतर त्यांना पुन्हा कामाला लावल्यास त्यांच्या कामाचा वेग मंदावतो. ते ‘कुरकुर’ करु लागतात. त्यामुळे त्यांचे नव्याने ‘प्रोग्रॅमिंग’ करण्याची आवश्यकता निर्माण होते. हा प्रकार विशेषत: घरसफाई करणाऱ्या किंवा लॉनचे सपाटीकरण करणाऱ्या यंत्रमानवांच्या संदर्भात अधिक प्रमाणात होतो. घरसफाई करणाऱ्या यंत्रमानवाला दिवसाकाठी जास्तीत जास्त एक तास काम असते. लॉक मोईंग करणाऱ्या यंत्रमानवाला 40 ते 45 मिनिटे काम असते. त्यानंतर बराच काळ ते नुसते पडून असतात. याच काळात त्यांच्यात ‘आळस’ शिरतो. नंतर ते पुन्हा लवकर कामासाठी सज्ज होत नाहीत. त्यामुळे त्यांना कामाला ‘लावण्यासाठी विशेष तंत्रवैज्ञानिक प्रयत्न करावे लागतात. त्यांचा प्रोग्रॅम ‘रीसेट’ करावा लागतो. याचाच अर्थ असा की त्यांना थोडासा शिस्तीचा ‘डोस’ द्यावा लागतो. त्यानंतरच ते पुन्हा पूर्वीसारखे कामाला लागतात.
याचाच अर्थ असा की, मानव असो, की यंत्रमानव, त्याने सतत कामात राहण्याची आवश्यकता असते. आळसामुळे मानवात जसे एक प्रकारचे जडत्व येते, तसेच ते यंत्रमानवांमध्येही येत असते. त्यामुळे त्यांनाही सातत्याने कार्यतत्पर आणि सज्ज ठेवण्याची आवश्यकता असते. हे करण्यासाठी सुलभ आणि कमी खर्चाचे उपाय कोणते आहेत, याचा आता संशोधकांकडून आणि तंत्रज्ञांकडून अभ्यासपूर्वक शोध घेतला जात आहे. अन्यथा, यंत्रमानवाचा उपयोग महाग पडू शकतो.
Comments are closed.