सर्वसामान्य भारतीयसुद्धा अंतराळवीर होऊ शकतो.

गगनयान मोहिमेनंतर मिळणार अंतराळात जाण्याची संधी

वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आता पहिल्यांदाच स्वत:च्या अंतराळवीरांच्या पथकात सामान्य नागरिकांना सामील करणार आहे. भारताच्या मानवयुक्त अंतराळ मोहिमांचे भविष्य पाहता हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत भारतीय अंतराळवीरांच्या निवडीत मुख्यत्वे वायुदलाच्या प्रशिक्षित वैमानिकांना प्राथमिकता दिली जात राहिली आहे, परंतु आता वैज्ञानिक आणि तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांनाही संधी मिळणार आहे. हा बदल गगनयान मोहीम आणि त्यानंतरच्या मोहिमांना विचारात घेत करण्यात येणार आहे.

गगनयान भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. याच्या अंतर्गत तीन अंतराळवीरांना पृथ्वीपासून जवळपास 400 किलोमीटरच्या उंचीवरील कक्षेत पाठविण्यात येणार आहे. ही मोहीम तीन दिवसांपर्यंत चालणार असून त्यानंतर अंतराळवीरांना सुरक्षितपणे भारतीय सागरी क्षेत्रात उतरविण्यात येणार आहे. स्वबळावर माणसांना अंतराळात पाठवू शकणाऱ्या निवडक देशांच्या यादीत या मोहिमेमुळे भारत सामील होणार आहे.

दुसऱ्या तुकडीत 10 अंतराळवीर

इस्रोची अंतराळवीर निवड आणि व्यवस्थापन समितीने दुसऱ्या तुकडीत एकूण 10 भारतीय अंतराळवीरांना सामील करण्याची शिफारस केली आहे, यात…

-6 सदस्य सैन्य विमानो•ाण पार्श्वभूमीतील असणार.

-4 सदस्य नागरिक तज्ञ असणार.

या नागरिक उमेदवारांची निवड एसटीईएम म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग आणि गणित क्षेत्रांमधून करण्यात येणार आहे.

पहिल्या तुकडीत सर्व वायुदलाचे अधिकारी

पहिल्या तुकडीत निवडण्यात आलेले चारही अंतराळवीर भारतीय वायुदलाचे अधिकारी असून सर्व टेस्ट पायलट राहिले आहेत. या अंतराळवीरांमध्ये खालील सदस्य सामील आहेत…

-एअर कमोडोर प्रशांत बी. नायर

-ग्रूप कॅप्टन शुभांशु शुक्ला

-ग्रूप कॅप्टन अजीत कृष्णन

-ग्रूप कॅप्टन अंगद प्रताप

या सर्वांची निवड या मोहिमेसाठी करण्यात आली कारण प्रारंभिक मानवयुक्त मोहिमेत सुरक्षित उ•ाणाला सर्वात मोठी प्राथमिकता देण्यात आली आहे.

हेलिकॉप्टर पायलटलाही संधी

अंतराळवीरांच्या दुसऱ्या तुकडीत लढाऊ वैमानिकांसोबत भारतीय वायुदलाच्या कॉम्बॅट हेलिकॉप्टर वैमानिकांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.

नागरिक कधी अंतराळात जाणार?

अंतराळवीरांच्या दुसऱ्या तुकडीत नागरिकांची निवड होणार असली तरीही त्यांना चौथ्या गगनयान मोहिमेपासून अंतराळ उ•ाणांमध्ये सामील केले जाऊ शकते. म्हणजेच प्रारंभिक मोहिमांमध्ये अनुभवी सैन्य वैमानिकांनाच प्राथमिकता मिळू शकणार आहे.

अंतराळ स्थानकाची तयारी

इस्रोचे हे पाऊल केवळ गगनयानपुरती मर्यादित नाही. इस्रो भविष्यात नियमित मानवी मोहीम, अंतराळात वैज्ञानिक संशोधन आणि भारताच्या प्रस्तावित अंतराळ स्थानकाची तयारी करत आहे. याचमुळे दीर्घकाळासाठी स्थायी अंतराळवीर कॅडर निर्माण करण्याची योजना आखली जातेय.

तिसऱ्या तुकडीत वाढणार नागरिकांची संख्या

समितीच्या अनुमानुसार…

-तिसऱ्या तुकडीत 12 अंतराळवीर असतील.

-यात दोन मिशन पायलट असणार.

-10 नागरिक तज्ञांचा समावेश असणार

एकंदरीत भविष्यात 40 अंतराळवीरांचा कॅडर निर्माण करण्याची योजना आहे.

प्रशिक्षणाकरता 4.5 वर्षे

एका अंतराळवीराची निवड, प्रशिक्षण आणि मोहिमेच्या तयारीची पूर्ण प्रक्रिया जवळपास 4.5 वर्षे चालणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या इस्रोकडे अस्थायी प्रशिक्षण केंद्र आहे आणि लवकरच पूर्ण विकसित अंतराळवीर प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाऊ शकते.

Comments are closed.