मॅच फिक्सिंगप्रकरणात कोलकाता नाईट रायडर्सचा माजी खेळाडू अडकला, आयसीसीने केले निलंबित

आयपीएल २०२६ येत्या २८ मार्चपासून सुरू होणार आहे. याआधीच वेस्ट इंडिजमधून एक चकित करणारी बातमी समोर येत आहे. कॅरिबियन क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये फसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) त्वरीत त्याच्यावर कारवाई केली आहे. आयसीसी त्याला लगेचच निलंबित करत त्याच्यावर बंदी आणली आहे. हा तोच खेळाडू आहे जो आयपीएलचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. सध्या तो मागील काही वर्षांपासून आयपीएलचा भाग नाही. तो आहे वेस्ट इंडिजचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेव्हॉन सियरल्स.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू जेव्हॉन सियरल्सला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.
सियरल्सने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केले. ही घटना २०२३-२४मध्ये बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या बीआयएम १० (BIM 10) लीगमध्ये घडली. सियरल्सबरोबर आणखी दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या स्पर्धेत सामन्यांच्या निकालांचे आणि खेळाच्या परिस्थितीवर प्रभाव पाडण्यासाठी फेरफार केल्याप्रकरणी असे आरोप त्यांच्यावर लावले गेले आहेत.
सियरल्सबरोबर टायटन्स संघाचे मालक चित्तरंजन राठोड आणि संघाचे अधिकारी ट्रेव्हॉन ग्रिफिथ यांचीही चौकशी करण्यात आली. राठोड आणि ग्रिफिथ यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले. आयसीसी आणि वेस्ट इंडिज क्रिकेटने भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याने या तिघांवर कारवाई केली आहे.
सियरल्सने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले. त्याने २०१८च्या हंगामात केकेआरसाठी ४ सामने खेळले आणि दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्याने वेस्ट इंडिजच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, तिघांनाही विविध कलमांखाली आरोपी ठरवण्यात आले आहे.
ग्रिफिथ यांच्यावर आयसीसीने चार आरोप लावले आहेत. त्यामध्ये सामन्याचे निकाल ठरवणे, खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारात सामील करणे आणि भ्रष्टाचार विरोधी चौकशीत मदत न करणे यांचा समावेश आहे. ग्रिफिथ आणि सिएर्ल्स यांच्यावर वेस्ट इंडिज क्रिकेटनेही भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट केले आहे.
या तिघांनाही त्यांच्यावर लावलेल्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा अवधी दिला आहे. याआधीही यूएसएचा ऍरॉन जोन्सवर वेस्ट इंडिज क्रिकेट आणि आयसीसीने भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच आरोप लावले होते आणि त्याला निलंबित केले होते.
Comments are closed.