नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना अटक; बालेन शाह यांच्या शपथविधीनंतर दुसऱ्या दिवशीच कारवाई
नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना शनिवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. गेल्या वर्षी झालेल्या ‘Gen Z’ आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारा प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ओली यांच्यासोबतच माजी गृहमंत्री रमेश लेखक यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमके प्रकरण काय?
सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तरुण पिढीने (Gen Z) मोठे आंदोलन पुकारले होते. ८ आणि ९ सप्टेंबर रोजी झालेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आणि कारवाईत एकूण ७७ जणांचा मृत्यू झाला होता, तर २,५०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेनंतर ओली सरकार कोसळले होते.
नुकताच या हिंसाचाराचा तपास करणाऱ्या आयोगाने आपला अहवाल सादर केला होता. या अहवालात तत्कालीन पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि गृहमंत्री रमेश लेखक यांनी हिंसाचार रोखण्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप तरुणांचा बळी गेला, असा ठपका ठेवण्यात आला आहे.
बालेन शाह यांच्या शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी कारवाई
नेपाळमध्ये ५ मार्च २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बालेन शाह यांच्या ‘राष्ट्रिय स्वतंत्र पार्टी’ने (RSP) ऐतिहासिक विजय मिळवला. शुक्रवारी (२७ मार्च) बालेन शाह यांनी नेपाळचे ४७ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी या तपास अहवालाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला, ज्यानुसार ही अटकेची कारवाई करण्यात आली.
Comments are closed.