फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, दोन मृत

उत्तर प्रदेशातील दुर्घटनेत पाच जण गंभीर : आजूबाजूची घरे जमीनदोस्त

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये रविवारी एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. मोठ्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. या दुर्घटनेत एका दाम्पत्याचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण घटनेत आजूबाजूची घरे जमीनदोस्त झाली आहेत. स्फोटाचा आवाज ऐकून नजिक राहणारे लोक घराबाहेर पळून घटनास्थळी गेले. स्थानिक लोकांनी आत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. मदत व बचावकार्यादरम्यान पाच जणांना वाचविण्यात आल्याचे समजते. काही माध्यमांनी या दुर्घटनेत पाच ते सात जणांचा बळी गेल्याचा दावा केला आहे.

गुडंबा पोलीस स्टेशन परिसरातील बेहटा भागात रविवारी फटाके कारखान्यात स्फोटाची ही घटना घडली. स्फोट झाल्यानंतर पोलीस आणि रुग्णवाहिकेलाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. पथकाने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सुमारे पाच जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या शोकाकुल कुटुंबांना शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Comments are closed.