राजस्थानमध्ये स्फोटाचा कट; टोही एजंट पकडला

पाकिस्तानी ‘डॉन’च्या संपर्कात असल्याचे उघड

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राजस्थानमधील बॉम्बस्फोटाच्या कटात सामील असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. श्री गंगानगरचा रहिवासी असलेला 19 वर्षीय आकाशदीप याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केल्यानंतर बॉम्बस्फोटाचा कट उघड झाला आहे. पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टीच्या आदेशानुसार दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये टेहळणी करून व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची कबुली आकाशदीपने दिली आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे महत्त्वाच्या माहितीसह अनेक व्हिडिओ भट्टीला पुरविले आहेत.

आकाशदीप इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर दहशतवादी शहजाद भट्टीच्या संपर्कात होता, असे लालगढ जतन पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर गुरमेल सिंग ब्रार यांनी सांगितले. सदर आरोपी देशविरोधी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होता. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याबद्दल त्याने काही गावकऱ्यांना धमक्याही दिल्या होत्या. आकाशदीपने शहजाद भट्टीच्या सांगण्यावरून जास्त गर्दीची ठिकाणे निवडली होती. आरोपीने या ठिकाणी स्फोटांचे नियोजन केले. पोलीस आता त्याच्या स्थानिक संपर्कांची आणि कुटुंबीयांची चौकशी करण्याची तयारी करत आहेत.

मोबाईल डेटा तपास सुरू

पोलिसांनी आकाशदीपच्या मोबाईल फोनमधून अनेक धागेदोरे मिळवले आहेत. त्याने वेगवेगळ्या नावांनी सोशल मीडिया खाती तयार केल्याचे आढळून आले आहे. त्याने भारत आणि पाकिस्तानमधील लोकांशी व्हॉइस चॅट केल्याचा आणि विशिष्ट क्रमांकांवर माहिती पाठवल्याचा आरोप आहे. याशिवाय, त्याच्या फोटो गॅलरीमध्ये दहशतवादी शहजाद भट्टीसोबत काढलेला एक फोटो सापडला आहे.

आरडीएक्स कनेक्शनचा संशय

या प्रकरणाचा संबंध 12 दिवसांपूर्वी पंजाबमध्ये सापडलेल्या आरडीएक्स प्रकरणाशी असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात अटक केलेल्या तीन आरोपींपैकी एक राजस्थानच्या अजमेरचा होता. तो शहजाद भट्टीच्या सांगण्यावरून स्फोटांचे नियोजन करत होता. त्यांनी हनुमानगडमध्ये स्फोट घडवण्याची योजना आखली होती. स्फोट घडवण्यासाठी निघालेल्या तिन्ही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. स्फोटके, आयईडी आणि इतर साहित्यासह अंबाला कॅन्टच्या दिशेने जात असताना विशेष कृती दलाने (एसटीएफ) त्यांना पकडले. त्यांचा कट खूप आधीच उघडकीस आला होता आणि एसटीएफने त्यांना रोखले होते.

Comments are closed.