परराष्ट्र व्यवहार मंत्री जैशंकर रशियालाही भेट देतील

रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेणार : टॅरिफ वॉर दरम्यान परराष्ट्रमंत्र्यांचा महत्त्वाचा दौरा

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारत आणि रशियाचे संबंध खूप जवळचे होत आहेत. अलिकडेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाला भेट देत मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर देखील पुढील आठवड्यात रशियाला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतील. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर माहिती शेअर करत दौऱ्याची माहिती जारी केली. 21 ऑगस्ट रोजी मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यात बैठक होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बैठकीत आंतरराष्ट्रीय चौकटीअंतर्गत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर व सहकार्य दृढ करण्यावर चर्चा केली जाईल. यासोबतच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केली जाईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षाच्या अखेरीस भारताला भेट देऊ शकतात. अशा परिस्थितीत दोन्ही नेत्यांच्या बैठकीत पुतिन यांच्या भेटीच्या तयारीवरही चर्चा होऊ शकते. भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये काही कटुता  निर्माण झालेली असतानाच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा रशिया दौरा होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादल्यानंतर ही कटुता निर्माण झाली आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल आणि युक्रेन युद्धाला प्रोत्साहन दिल्याबद्दल अमेरिकेने भारतावर मोठा कर लादला आहे. तसेच, अमेरिकन सरकार सध्या पाकिस्तानशी जवळीक वाढविण्यात व्यग्र आहे. अशा परिस्थितीत भारत देखील आपल्या सर्व पर्यायांवर विचार करत आहे.

डोवाल यांच्या भेटीदरम्यान लष्करी तांत्रिक सहकार्यावर चर्चा

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या रशिया भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील लष्करी तांत्रिक सहकार्याशी संबंधित मुद्यांवरही चर्चा झाली. भारतातील रशियन दुतावासाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली होती. यासोबतच नागरी विमान निर्मिती, धातू उद्योग आणि रासायनिक उद्योग यासारख्या इतर धोरणात्मक क्षेत्रात संयुक्त प्रकल्प राबविण्यावरही चर्चा झाली.

Comments are closed.