मंत्रालयातील फेस रिकग्निशन सिस्टीमचा उडाला बोजवारा, 41 कोटींचा खर्च वाया गेला; प्लॅप सताड उघडे, स्कॅनर तुटले
मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी फेशिअल रेकग्निशन सिस्टीम सुरू करण्यात आली; पण दीड वर्षात या सिस्टीमचा बोजवारा उडाला आहे. एका एंट्री पॉइंटवरील फेस स्कॅनरच तुटला आहे, तर मंत्रालय पोलीस नियंत्रण कक्षाच्या बाहेरील ही सिस्टीम नादुरुस्त झाल्यामुळे या सिस्टीमचे फ्लॅप सताड उघडे पडले आहे. त्यामुळे या सिस्टीमवर खर्च केलेले 41 कोटी रुपये वाया गेल्यात जमा आहेत.
मंत्रालयात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी तर पाच हजारांपेक्षा अधिक व्हिजिटर्स मंत्रालयात येतात. त्यामुळे वीज, पाणी, लिफ्ट, पँटीन अशा सुविधांवर प्रचंड ताण पडतो. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील व्हरांडय़ात तर व्हिजिटर्सची प्रचंड गर्दी होते. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना या गर्दीतून वाट काढणे कठीण होते. त्यामुळे मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावर फेशिअल रेकग्निशन सिस्टीम आणली. मंत्रालयातील कर्मचारी-अधिकारी सचिव आणि कंत्राटी कामगारांचे फेस स्कॅनिंग करण्यात आले आहे. व्हिजिटर्सना आरएफआयडी कार्ड दिली आहेत.
पण गेल्या काही दिवसांपासून या सिस्टीममध्ये बिघाड होऊ लागले आहेत. गार्डन गेटवरून फेस स्कॅनिग करून मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करताना पुन्हा एकदा फेस स्कॅनिंग करावे लागते. पण या पॉइंटवरील फेस स्कॅनर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. या पॉइंटवरील एका बाजूला असलेल्या मोकळ्या मार्गिकेतून व्हिजिटर्स आणि कर्मचाऱ्यांनाही फेस स्कॅनिंग न करता थेट मंत्रालयात प्रवेश करता येतो.
मंत्रालयाची इमारत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने मंत्रालय परिसर एकात्मिक सुरक्षा व देखरेख अंतर्गत मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबवण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम व वार्षिक देखभाल करण्यासाठी तब्बल 41 कोटी 75 लाख 5 हजार 634 रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. पण तरीही फेशिअल रेकग्निशन सिस्टीमचे तीनतेरा वाजल्याचे मंत्रालयातील अधिकारी सांगतात.
मंत्रालयातील पोलीस उपायुक्तांच्या बाहेरील स्कॅनर नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे आज दिवसभर या पॉइंटवरील फ्लॅप उघडेच होते. त्यामुळे आतमध्ये थेट प्रवेश मिळत होता. मंत्रालायाच्या विस्तारित इमारतीमध्ये तर एक पोलीस कर्मचारी आरएफआयडी कार्ड घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून बसवला आहे. फेस स्कॅन होण्यास वेळ लागतो. त्यामुळे पोलीस कर्मचारीच हातातील आरएफआयडी कार्ड मशीनला लावून गेट उघडून देतात.
Comments are closed.