कसोटीत अपयश, मर्यादित षटकांत वर्चस्व! पहा गौतम गंभीर यांचे संपूर्ण रिपोर्ट कार्ड

मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्यासाठी 2025 हे वर्ष संमिश्र यशाचे ठरले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये, म्हणजे एकदिवसीय (ODI) आणि टी20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने संपूर्ण जगात आपला दबदबा निर्माण केला. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने या वर्षी ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ आणि ‘आशिया चषक’ यांसारख्या मोठ्या स्पर्धा जिंकून ऐतिहासिक यश संपादन केले. मात्र, या यशाच्या तुलनेत कसोटी क्रिकेटमधील कामगिरी काहीशी निराशाजनक राहिली. वर्षाची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाने झाली, तर वर्षाचा शेवट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभूत होऊन झाला.

कसोटी क्रिकेटमध्ये भारताने या वर्षी 10 सामने खेळले, त्यापैकी केवळ 4 सामन्यात विजय मिळवता आला, तर 5 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर भारताने मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवून आपली ताकद दाखवली होती, पण दक्षिण आफ्रिकेने भारताचा 2-0 ने पराभव केल्यामुळे कसोटीतील चिंतेत भर पडली. याउलट, एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने 14 पैकी 11 सामने जिंकले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला नमवून भारताने जेतेपदावर नाव कोरले.

टी20 क्रिकेटमध्येही भारतीय संघाने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला. आशिया चषकात पाकिस्तानला तीन वेळा पराभूत करून भारताने आशियाई चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. तसेच इंग्लंडविरुद्धची मालिका 4-1 अशा मोठ्या फरकाने जिंकली. एकूणच, 2025 हे वर्ष पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये भारताच्या वर्चस्वाचे राहिले, तर लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाला अजून बरीच मेहनत घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले.

Comments are closed.