मेहकर तालुक्यातील परतापूर येथे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरवर प्रशासनाचा छापा, रंगेहाथ अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तालुक्यातील परतापूर येथे बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या एका बोगस डॉक्टरसह त्याच्या सहकाऱ्यांना आज आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने रंगेहाथ पकडले. पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या प्रकारावर कारवाई करत पथकाने घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, औषधे आणि इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोग्य सेवा अकोला मंडळाचे आरोग्य उपसंचालक वाकचौरे यांच्या आदेशानुसार आणि बुलढाण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे या कारवाईचे नियोजन करण्यात आले होते. परतापूर येथील रसाळ यांच्या घरात हा बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

आरोग्य व पोलीस पथकाने रसाळ यांच्या घरावर सापळा रचून धाड टाकली. यावेळी बोगस डॉक्टर अनिल रामदास सोनुने हा एका महिलेचे बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ आढळून आला. पथकाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले. घटनास्थळावरून गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन विविध प्रकारची औषधे, इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गोपनीयतेने आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. या संयुक्त पथकात पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस कर्मचारी लक्ष्मण कटक, शिवनकर, संदीप भोंडाने, मोहम्मद परसूवाले, केशव अवचार आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सरकटे. मंगला वायाळ (सिस्टर), प्रशांत बोरे आणि अधिपरिचारिका वायाळ (वरिष्ठ लिपीक) हे होते.

कायद्यानुसार बंदी असलेले गर्भलिंग निदान करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने परिसरात चर्चांना उधाण आले आहे. संशयित आरोपींविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याची कारवाई प्रशासनातर्फे सुरू आहे.

Comments are closed.