डोंबिवलीत भोंदू बाबाचा पर्दाफाश, विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या
डोंबिवलीत श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला आहे. विष्णूनगर पोलिसांनी दीपक सावंत (५०) या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या आहेत. मुलीच्या लग्नातील कथित ‘दोष’ दूर करण्याच्या बहाण्याने सावंत याने एका पीडित कुटुंबाची फसवणूक करत सोन्याचे दागिने लुबाडले होते.
पीडित व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नात अडथळे येत असल्याने चिंतेत होता व त्यावर उपाय शोधत होता. याच संधीचा फायदा घेत दीपक सावंत याने विशेष धार्मिक विधी करून दोष दूर करण्याचे आमिष दाखवले. आरोपीने पीडितांना विश्वासात घेत कथित विधीसाठी सोन्याचे ब्रेसलेट व चांदीची लक्ष्मी नाणी आणण्यास सांगितले. विधीदरम्यान त्याने हे दागिने लाल रंगाच्या रुमालात ठेवण्यास सांगितले. मात्र चलाखीने त्याने रुमालाची अदलाबदल करून दुसरा रुमाल पीडितांच्या हातात देत तेथून पळ काढला. काही वेळानंतर रुमाल उघडल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी तत्काळ विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला कल्याण
परिसरातून अटक केली.
पोलिसांचे आवाहन
दीपक सावंत या भोंदूने यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असून फसवणूक झालेल्या नागरिकांनी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Comments are closed.