कधी बोललो नाही, कधी विचारही केला नाही! नवजोत सिंग सिद्धू यांचा व्हायरल फेक पोस्टविरुद्ध संताप

सोशल मीडियाच्या अफवांच्या जगात पुन्हा एकदा एका प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाने फेक पोस्ट व्हायरल झाली आहे. यावेळी लक्ष्य बनले आहेत माजी क्रिकेटपटू आणि लोकप्रिय भाष्यकार नवजोत सिंग सिद्धू. हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्या नावाने एक बनावट विधान सोशल मीडियावर गाजू लागले, ज्यावरून त्यांनी संताप व्यक्त करत ठाम प्रतिक्रिया दिली आहे.
त्या व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, सिद्धूंनी म्हटले जर हिंदुस्थानला 2027 वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर बीसीसीआयने लवकरात लवकर अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना हटवून रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवावे.
मात्र, सिद्धूंनी हा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळला. त्यांनी एक्सवर लिहिले, “कधी बोललो नाही, कधी विचारही केला नाही. खोटय़ा बातम्या पसरवू नका. शेम ऑन यू!’’ त्यांच्या या तीव्र प्रतिक्रियेनंतर चाहत्यांनीही फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
टीममध्ये बदलांची प्रक्रिया सुरूच
बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी संघात मोठे बदल सुरू आहेत. शुभमन गिलला कसोटी आणि वन डे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्यासंदर्भात अद्यापही निर्णय बाकी आहे. 2027 च्या विश्वचषकासाठी अजून दोन वर्षांचा अवधी असला तरी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंबाबत चर्चेचा सूर कायम आहे.
Comments are closed.