बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद

हिंगोली : पोलिसांच्या नावाने सामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याच्या घटना आपण ऐकतो, मात्र हिंगोलीमध्ये चक्क पोलिसांनाच गंडा घालणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट रेल्वे पोलीस बनून पोलीस अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या मध्यप्रदेशातील सराईत टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

क्राईम मोडस ऑपरेंडी : अपघाताची खोटी कहाणी सांगून फसवणूक

या प्रकरणात आरोपी अज्ञात क्रमांकावरून फोन करत स्वतःची ओळख ‘खंडवा रेल्वे स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार’ अशी करून देत होते. ते बनावट रेल्वे अपघाताची कथा सांगून संबंधितांना भावनिक जाळ्यात अडकवत होते. कळमनुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रेमप्रकाश माकोडे यांनाही असा फोन आला होता.

खंडवा येथे कळमनुरीतील एका मुलीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून मृतदेह पाठवण्यासाठी आइस बॉक्स खरेदी करायचा आहे, असे सांगत 5 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. माणुसकीच्या भावनेतून माकोडे यांनी तातडीने पैसे पाठवले.

Police Suspicion : संशय आल्याने उघड झाला प्रकार

असाच प्रकार वसमत ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्यासोबत घडला. मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी घटनेची खातरजमा केली. तपासात खंडवा येथे असा कोणताही अपघात घडलेलाच नसल्याचे समोर आले आणि फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

Police Action : मध्यप्रदेशात जाऊन आरोपींना अटक

यानंतर हिंगोली पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासाद्वारे या टोळीचे धागेदोरे मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यापर्यंत पोहोचले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत कारवाई करत अमित कुर्मी, वीरसिंग गौंड आणि भारत कुर्मी या तिघांना अटक केली. या प्रकरणातील सीताराम कुर्मी हा चौथा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

Nationwide Fraud : देशभरात फसवणुकीचा संशय

प्राथमिक तपासात या टोळीने देशभरात अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनाच फसवणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाला असला तरी या घटनेतून नागरिकांनी सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Safety Alert : व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा गरजेची

मदतीच्या नावाखाली फसवणूक करणारे भामटे सक्रिय असल्याने कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित माहितीची खातरजमा करणे अत्यंत गरजेचे आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.