पाकिस्तानी खेळाडूवर ICC ची मोठी कारवाई! सामन्यादरम्यान 'या' कृतीसाठी ठोठावली कठोर शिक्षा

पाकिस्तान क्रिकेट संघाने नुकतीच घरच्या मैदानावर झालेली टी20 ट्राय-सीरीज म्हणजेच त्रिकोणीय मालिकेत अंतिम सामन्यात श्रीलंकेला 6 विकेट्सनी हरवून जिंकली. अंतिम सामन्यात पाकिस्तानने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट खेळ केला, परंतु सामन्यानंतर संघाचा आक्रमक फलंदाज फखर जमानला (Fakhar jaman) एका चुकीच्या कृतीमुळे मोठा फटका बसला. ICC ने फखरविरुद्ध कठोर कारवाई केली असून, आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर मोठा दंड ठोठावला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या ट्राय-सीरीजच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा संघ प्रथम गोलंदाजी करत होता. श्रीलंकेच्या डावातील 19व्या षटकातील पहिल्या चेंडूवर फखरने दसुन शनाकाचा एक उत्कृष्ट झेल पकडला. मात्र, हा झेल योग्य आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी मैदानातील पंचांनी (Field Umpire) निर्णय तिसऱ्या पंचांकडे (Third Umpire) पाठवला.

रिप्लेमध्ये दिसून आले की, झेल घेताना चेंडू जमिनीला लागला होता, म्हणून तिसऱ्या पंचांनी शनाकाला नॉट आऊट (Not Out) दिले. या निर्णयामुळे फखर खूप नाराज दिसला आणि त्याने मैदानातील पंचांकडे आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर, त्याच षटकातील पुढच्याच चेंडूवर जेव्हा शनाका बोल्ड झाला, तेव्हा फखरने पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे (Third Umpire) दोन्ही हात वर करून इशारा केला आणि आपला राग व्यक्त केला. याच कृतीमुळे ICC ने त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.

आयसीसीने फखर जमानवर आचारसंहितेच्या नियम 2.8 (लेव्हल-१) चे उल्लंघन केल्याचा आरोप लावला. यामुळे त्यांच्या सामना शुल्कातून (Match Fees) 10% रक्कम कापण्यात आली. याव्यतिरिक्त, फखरच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट (Demerit Point) जोडण्यात आला. गेल्या 24 महिन्यांमध्ये हे त्यांचे पहिलेच उल्लंघन आहे. फखरने आयसीसीचा हा निर्णय मान्य केला आहे, त्यामुळे यापुढे कोणतीही औपचारिक सुनावणी होणार नाही.

Comments are closed.