तामिळनाडूसाठी कौटुंबिक नियोजन प्राणघातक ठरले

मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा दावा : लवकर अपत्यांना जन्म देण्याचे आवाहन

वृत्तसंस्था/ चेन्नई

हिंदी भाषेवरून वाद अन् परिसीमनामुळे दक्षिणेतील राज्यांचे नुकसान होणार असल्याच्या दाव्यादरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी स्वत:च्रा राज्यातील जनतेला लवकरात लवकर मुलं जन्माला घालावीत असे आवाहन केले आहे. परिवार नियोजन यशस्वीपणे लागू करणेच आता नुकसानदायक ठरत आहे. लोकसंख्येच्या आधारावर परिसीमन करण्यात आल्यास तामिळनाडूला अनेक जागांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. दक्षिण भारतातील अनेक मतदारसंघ कमी होतील, अशा स्थितीत दक्षिणेचे केंद्रातील प्रतिनिधित्व अन् दबदबा देखील कमी होणार असल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला आहे.

स्टॅलिन यांनी परिसीमनच्या मुद्द्यावर 5 मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांना परस्परांमधील मतभेद विसरून बैठकीत सामील होण्याचे आवाहन पेले आणि परिसीमनचा मुद्दा तामिळनाडूसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे वक्तव्य केले आहे.

मुलांमध्ये अंतर असावे असे आम्ही पूर्वी म्हणत असायचो. पंरुत आता लवकरात लवकर मुले जन्माला घाला असे म्हणावे लागत आहे असे उद्गार स्टॅलिन यांनी काढले आहेत. यापूर्वी स्टॅलिन यांनी सर्वांना एकत्र मिळून तामिळनाडूच्या भविष्याविषयी विचार करावा लागेल, आम्हाला आमच्या अधिकारांसाठी लढावे लागेल असे म्हटले होते.

दुसरीकडे स्टॅलिन हे नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला देखील विरोध करत आहेत. तामिळनाडूच्या लोकांना हिंदी बळजबरीने लादली जात असल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. तर राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्यांवर हिंदी भाषा लादणारे नाही, यासंबंधी तामिळनाडूच्या विरोधामागे राजकीय कारण असल्याचा दावा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.

शिक्षण मंत्र्यांची ही टिप्पणी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि तीन भाषा धोरणाच्या अंमलबजावणीवरून तामिळनाडू सरकार अन् केंद्र सरकार यांच्यातील संघर्षादरम्यान समोर आली आहे. काही लोकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना उत्तर देऊ इच्छित नाही. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण भारताच्या विविध भाषांवर केंद्रीत आहे, सर्व भाषांचे समान महत्त्व आहे. तामिळनाडूत काही लोक राजकारणामुळे याला विरोध करत आहेत असे प्रधान यांनी म्हटले आहे.

एआयच्या युगात शाळांमध्sय कुठल्याही भाषेला तिसरी भाषा म्हणून लागू करणे अनावश्यक आहे. प्रगत अनुवाद तंत्रज्ञान पूर्वीच भाषासंबंधी अडथळ्यांना त्वरित दूर करते. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भाषांचा भार टाकला जाऊ नये असे स्टॅलिन यांनी म्हटले होते.

राजकारण तापले

स्वत:च्या 72 व्या जन्मदिनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी द्रमुकच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. तामिळनाडू सध्या दोन महत्त्वपूर्ण आव्हानांना सामोरा जात आहे. यातील एक भाषेची लढाई जी आमची जीवनरेषा आहे. तर दुसरी लढाई  परिसीमनाची असून जो आमचा अधिकार आहे. या लढाईविषयी कार्यकर्त्यांनी लोकांना माहिती द्यावी. परिसीमनाचा थेट प्रभाव राज्याचा आत्मसन्मान, सामाजिक न्याय आणि लोकांच्या कल्याणकारी योजनांवर पडणार आहे. राज्याचा प्रत्येक नागरिक राज्याला वाचविण्यासाठी एकजूट व्हावा म्हणून हा संदेश लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावा असे आवाहन स्टॅलिन यांनी केले होते.  2026 पासून परिसीमनाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. परिसीमन लोकसंख्येच्या आधारावर झाले तर दक्षिणेतील राज्यांच्या तुलनेत उत्तरेतील राज्यांमधील लोकसभा मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे. याचमुळे दक्षिणेतील राज्य या प्रक्रियेला विरोध करत आहेत.

Comments are closed.