स्वप्नील पंडित यांचे निधन

वाद्यवृंद क्षेत्रातील प्रसिद्ध कलावंत,  ‘मेघमल्हार’चे सर्वेसर्वा  आणि तबलावादक स्वप्नील पंडित यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 51  वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

स्वप्नील पंडित यांनी ‘मेघमल्हार’ आणि ‘स्वरसा’ मार्फत अनेक संगीतमय कार्यक्रम सादर केले. गीतसंगीताच्या आवडीमुळे ते कॉलेजजीवनापासून ऑर्पेस्ट्रा या क्षेत्राशी जोडले गेले. प्रख्यात तबलावादक पंडित विभव नागेशकर हे त्यांचे गुरू होते.  स्वप्नील पंडित यांनी आतापर्यंत चार हजारांहून अधिक गाण्यांचे कार्यक्रम केले. बुधवारी, 22 ऑक्टोबर रोजी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ‘देणे संस्कृतीचे’ हा दिवाळी पहाट कार्यक्रम केला. त्याआधी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांनी कल्याण येथे ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या गीतांवर आधारित ‘रंग उषेचे’ हा कार्यक्रम प्रस्तुत केला. या कार्यक्रमाला उषा मंगेशकर उपस्थित होत्या.  दोन्ही कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. मेघमल्हार  मार्फत विविध संगीतमय कार्यक्रम सादर करून रसिकांना सुमधूर गीतांची पर्वणी देणाऱ्या कलावंताने अचानक एक्झिट घेतल्याने मोठी  हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.