श्याम बेनेगल यांचे निधन, सर्जनशील दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड
‘अंकुर’, ‘मंथन’, ‘निशांत’, ‘भूमिका’ यासारख्या वास्तववादी, समांतर चित्रपटांचे निर्माते व सर्जनशील ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे आज निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. हिंदुस्थानच्या चित्रपटसृष्टीत आपला वेगळा कायमचा ठसा उमटवणाऱ्या श्याम बेनेगल यांच्या निधनामुळे समांतर चित्रपटाचे युग पोरके झाले, अशी भावना व्यक्त होत आहे.
श्याम बेनेगल हे किडनीच्या विकाराने आजारी होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सायंकाळी 6.30च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
श्याम बेनेगल यांचा जन्म हैदराबाद येथे 14 डिसेंबर 1934 रोजी झाला. 1962 पर्यंत कॉपी रायटर, लघुपट निर्मितीपासून त्यांनी कारकीर्द सुरू केली. 1973 साली ‘अंकुर’ या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आणि इतिहास घडला. पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. समांतर चित्रपटाचे युग सुरू झाले.
निशांत, मंथन, भूमिका, जुनून, आरोहण या चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सरदारी बेगम, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस – द फरगॉटन हीरो’, ‘वेल डन अब्बा’ या चित्रपटांनी आपली वेगळी छाप सोडली. जबरदस्त कथानक, वास्तववादी मांडणी हे श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांचे खास वेगळेपण होते. समांतर सिनेमाचे युग त्यांनी निर्माण केले. श्याम बेनेगल हे मनस्वी, सर्जनशील दिग्दर्शक होते. स्मिता पाटील, शबाना आझमी, ओमपुरी, नसिरुद्दीन शाह, अनंत नाग असे अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटांमधून घडले.
24 सिनेमे, 45 लघुपट आणि 15 अॅड फिल्म
श्याम बेनेगल यांनी 24 सिनेमे, 45 डॉक्युमेंट्री आणि 15 अॅड फिल्म्सचे दिग्दर्शन केले. जुबैदा, द मेकिंग ऑफ द महात्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस ः द फॉरगॉटन हीरो, मंडी, आरोहण, वेलकम टू सज्जनपूर यांसारखे उत्तम दर्जाचे सिनेमे त्यांनी बनवले.
समांतर सिनेमा बेनेगल यांचा श्वास
समांतर सिनेमा हा बेनेगल यांचा श्वास होता. बेनेगल यांनी अनेक वैविध्यपूर्ण विषय हाताळले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सत्यजीत रे यांच्यावर त्यांनी लघुपट बनवले. लघुपट आणि टीव्ही मालिका केल्या. भारत एक खोज आणि संविधान, यात्रा आणि कथा सागर या त्यांच्या प्रचंड गाजलेल्या मालिका आहेत. अंकुर सिनेमामुळे हिंदी सिनेसृष्टीला शबाना आझमी नावाची अभिनेत्री मिळाली. अंकुर या त्यांच्या पहिल्यावहिल्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
दहा दिवसांपूर्वी साजरा केला वाढदिवस
दहा दिवसांपूर्वी श्याम बेनेगल यांचा 90वा वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिनेत्री शबाना आझमी यांनी याबाबतचा फोटो एक्सवरून शेअर केला होता. या वेळी नसिरुद्दीन शहा यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.
बेनेगल हे व्हिजन असणारे दिग्दर्शक होते. त्यांनी अनेर सामाजिक विषय सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर आणले, जे सध्याच्या पिढीला प्रेरणादायी ठरतील, अशी प्रतिक्रिया लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली.
श्याम बेनेगल यांनी सिनेमात एक नवी लाट आणली. शबाना आझमी, स्मिता पाटील यांसारख्या दिग्गज कलाकारांना त्यांनी स्टार बनवले. अलविदा मित्रा! अशा शब्दात निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
श्याम बेनेगल यांना तब्बल 18 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पद्मश्री, पद्मभूषण या नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रतिष्ठत दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
Comments are closed.