वर्ल्ड कपचा ‘लूटबॉल’ सुरू; फिफाची वर्ल्ड कप तिकिटांच्या दरात प्रचंड वाढ, वर्ल्ड कपला मनी कप केल्याने फुटबॉलप्रेमी संतप्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आगामी फुटबॉल वर्ल्ड कप हा मनी कप आहे का?’ असा संताप आता फुटबॉलप्रेमींच्या मनातून उफाळून बाहेर पडू लागलाय. अजून वर्ल्ड कप सुरू व्हायला अडीच महिने आहेत, पण फिफाने आधीच तिकिटांच्या दरवाढीचा असा झटका दिलाय की, सामान्य चाहत्यांचे स्वप्नच धुळीस मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 48 संघाची नावे निश्चित होताच वर्ल्ड कपचा फुटबॉल नव्हे तर लूटबॉल सुरु केल्याची भावना उफाळून वर आली आहे.

बुधवारीच वर्ल्ड कपचे 48 संघ निश्चित होताच फिफाने फुटबॉलप्रेमींच्या खिशावरच डल्ला मारण्याची किक मारली. अंतिम सामन्यासाठी कमाल तिकीट दर तब्बल 10,990 अमेरिकन डॉलरपर्यंत नेण्यात आला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या दरांच्या तुलनेत ही प्रचंड वाढ असून, आधी श्रेणी एकचे तिकीट 8,680 डॉलर होते. याचाच अर्थ 7.20 लाखांची तिकीट त्यांनी आता 9.13 लाखांच्या घरात नेलीय. तब्बल दोन लाख रुपयांची वाढ.

न्यू जर्सीतील मेटलाइफ स्टेडियम येथे 19 जुलैला होणाऱया अंतिम सामन्यासाठी श्रेणी दोनचे तिकीट 5,575 डॉलरवरून थेट 7,380 डॉलरपर्यंत पोहोचले आहे. तर श्रेणी तीनचे तिकीट 4,185 डॉलरवरून तब्बल 5,785 डॉलरपर्यंत वाढले आहे. या दरवाढीमुळे सामान्य चाहत्यांसाठी हा महोत्सव पाहणे आता जवळपास अशक्यच बनत चालले आहे.

साखळी सामन्यांच्या टप्प्यातील 72 पैकी केवळ 17 सामनेच सध्या तिकिटांसाठी खुले करण्यात आले आहेत, तर बाद फेरीतील एकाही सामन्याची तिकिटे अद्याप उपलब्ध नाहीत. मागणीनुसार दर बदलणाऱया ‘किंमत पद्धती’चा वापर करत फिफाने कमाईचा नवा डाव टाकल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Comments are closed.