लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा हाहाकार; पान चिंचोलीत 70 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, जिल्ह्यातील चौथा बळी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लातूर जिल्ह्यात सध्या सूर्याचा प्रक्षोभ पाहायला मिळत असून उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने नागरिकांचे जगणे असह्य केले आहे. उष्माघातामुळे मंगळवारी 28 एप्रिल रोजी निलंगा तालुक्यातील पान चिंचोली येथे शेतात काम करत असताना 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्र्यंबक नारायण बेळंबे असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, जिल्ह्यातील उष्माघाताचा हा चौथा बळी ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पान चिंचोली येथील रहिवासी असलेले त्र्यंबक बेळंबे हे मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात बैल चारत होते. काम करत असतानाच त्यांना अचानक चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. उन्हाच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानामुळे त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. पान चिचोली येथील सार्वजनिक स्मशानभुमीत उष्माघाताने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा अंत्यविधी करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने 43 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. निलंगा तालुक्यातील कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या औराद शहाजनी परिसरातही तापमानाने उच्चांक गाठला आहे. काही दिवसांपूर्वीच औराद शहाजनी येथे एका शेतकऱ्याचा आणि औसा तालुक्यातील गोंद्री येथे एका 9 वर्षीय बालकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पान चिंचोलीतील या घटनेने जिल्हा हादरला आहे. उन्हामुळे शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे मोठे हाल होत आहेत.

प्रशासनाकडून दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्यात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वैद्यकीय अधिकारी या वाढत्या कार्यामुळे नागरिकांना काळजी घेण्यासंदर्भात सूचना देत असून त्याचे पालन करण्याचे आदेश प्रशासनाकडून वेळोवेळी दिले जात आहेत.

Comments are closed.