पानगाव शिवारात मर लागलेल्या 6 एकर हरभऱ्यावर शेतकऱ्यांनी फिरवला नांगर, 2 लाख 50 हजारांचे नुकसान

पानगाव-रेणापूर तालूक्यातील एका शेतकाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत शेतातील 6 एकर वरील हरभरा पिकाला मर लागल्याने संपूर्ण पिकावर नांगर फिरवला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे तब्बल 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

नागनाथ गोविंद तुरुप असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या शेतातील 6 एकर वरील हरभरा पिकाला मर लागली होती. रेणापूर तालुक्यात पानगाव शिवारातील तालुक्यातील अनेक शेतकरी पुन्हा एकदा वेगळ्या संकटात सापडला आहे. तालुक्यात रब्बी पिकामध्ये हरभरा पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सतत बदलत चाललेल्या वातावरणामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने हरभरा पिकाला मोठा फटका बसला आहे. रब्बी पिकाच्या पेरणीनंतर उगवलेले झाड काही दिवसानंतर जागीच पिवळे पडत आहे आणि ते पूर्णतः वाळून जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मर रोगाचे प्रमाण जास्त आहे. अति पावसाने अनेक ठिकाणी सोयाबीन पिक पाण्याअभावी काढता आले नाही. त्यामुळे आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले.

सध्या रब्बी हंगामामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत. मर लागलेल्या हरभऱ्यावर महागडी औषधांची फवारणी करून, महागडी खते घालून, अवाढव्य खर्च करुन देखील फरक पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी करताना रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया करून पेरणी केली, अशा शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा पिवळा पडून मर रोगाचे प्रमाण कमी आहे. तर पारंपारिक पद्धतीने पेरणीची पद्धत बदलून बिबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास त्याचा चांगला फायदा होतो, अशी चर्चा करताना तालुक्यातील शेतकरी दिसून येत आहेत. अगोदरच खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता वातावरणातील बदल आणि जास्त प्रमाणात पडलेल्या पावसामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली आहे.

मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने खरीप नंतर आता रब्बीचे पीक सुद्धा धोक्यात आले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हरभरा पिकावर मर रोग आटोक्यात नाही आला तर शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडणार आहेत. एकरी 6 क्विंटल बियाणे पेरण्यात आले होते. एकूण 6 एकरमध्ये जवळपास 42 क्विंटल बियाणे पेरण्यात आले होते. 6 एकरमध्ये एकूण 13 हजार रुपयांचे बियाणे, 10 हजार 800 रुपयांचा एकेरी खत वापरण्यात आला होता आणि या 6 एकरातील एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, असे सतिश तुरुप शेतकरी पानगाव यांनी सांगितले.

Comments are closed.