बाजार समितीत चोर्यांचे प्रमाण वाढले, भाजीपाल्याच्या गाळ्यावरच मटक्याचा धंदा
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात शेतमालाच्या चोर्या पुन्हा वाढल्या असून आता भाजीपाल्याच्या गाळ्यावर आता मटक्याचे धंदे सुरू झाले आहेत. वाहनचालकाचा मोबाईल चोरी आणि शेतकरी शेतमाल चोरीचे व्हिडिओ, ऑडिओ क्लिप वायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील बाजार समितीची सुरक्षा व्यवस्था वार्यावर असून बाजार व्यवस्थेला कोणी वाली राहिला नसल्याचे समोर आले आहे.
बाजार समितीत शेतमाल, मोबाईल, वाहनाच्या बॅटरी चोरी थांबायचे नाव घेत नाही. तरकारी विभागातील गाळ्यांवर पहिल्यापासून मटकावाले बसतात. शेतमालाची आवक सुरू झाल्यानंतर रात्री अकरा वाजताच चोर चोरी करून घरी जातात. सुरक्षा रक्षक मटका व्यवसाय आणि चोरांना काही बोलत नाही, अशी तक्रार एका आडत्याने केली. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरील वर्षाचा कोट्यवधी रुपये खर्च केवळ कागदावर दिसत असून यावर कारवाई कोण करणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
व्यापारी संचालक अन् आडते असोसिएशन निष्क्रिय
बाजारात शेतमाल चोरी, गुन्हेगारी आणि अवैध धंदे वाढले असून सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. शेतकर्यांसह आडत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आडते असोसिएशनची मुदत संपल्याने त्यांना संचालक मंडळ विचारत नाही. तर, व्यापारी संचालक देखील दुर्लक्ष करतात. त्यामुळे सर्वजण हैराण आहेत.
मोबाईल हप्त्यावर घेतला होता – वाहनचालक
एका वाहनचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सी जी ०४ एनटी २५७० हा माझ्या गाडीचा नंबर असून गाडी बाजारातील ४ नंबर गेट येथील पार्किंग मध्ये उभी असताना मोबाईल चोरीला गेला. माझा मोबाईल हफ्त्यावर खरेदी केला होता. मी गरीब माणूस आहे. ड्रायव्हर लोकांना इथे कोणतीही सेफ्टी नाही, अशी आपबीती या वाहन चालकाने सांगितली.
बाजारातील गैरप्रकार आणि रोज येणार्या वेगवेगळ्या तक्रारीवरून सभापती यांनी दुसर्यांना वैफल्यग्रस्त म्हणून उपयोग नाही तर स्वतः चा कारभार सुधारला पाहिजे. त्यामुळे सभापतींनी तालुक्यात धूर काढत फिरण्यापेक्षा बाजार समितीचा कारभार सुधारण्याकडे लक्ष द्यावे. – प्रशांत काळभोर, संचालक, बाजार समिती, पुणे.
शेतमाल चोरी आणि अवैध धंदे यावर कारवाई करण्याचे आदेश सुरक्षा व्यवस्थेला देण्यात येतील. शेतमालाची चोरी होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जाईल. – डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.
Comments are closed.