कृषिमंत्री भरणे यांना काजू-बदामाची प्लेट भेट; बैठकीत खाण्यापेक्षा बांधावर खाण्याचा सल्ला, शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा
मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना नांदेड येथील दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदामाचा घेण्यात आलेला आस्वाद चांगलाच पेटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे शिवसेनेसह शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा अडवून त्यांना काजू-बदामाची प्लेट भेट देण्यात आली. ‘बैठकीत काजू-बदाम काय खाता- शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त बांधावर खा…’, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
कृषिमंत्री भरणे हे आज वसमत तालुक्यातील सावा आणि वसमत परिसरात शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात असताना शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, तुषार जाधव, शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे तानाजी भोसले, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सतीश महागावकर, पप्पू जाधव, गोविंद जाधव, नवनाथ कुहे व शेतकऱ्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना काजू-बदामाची प्लेट देत निषेध करण्यात आला.
आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी ‘शेतकरी मरतोय आणि तुम्ही बैठकीत बसून काजू-बदाम खाता? ठोस उत्तर द्या, मदत कधी देणार?’ असा सवाल कृषिमंत्र्यांना केला. एकीकडे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, पिकं हातची गेली आहेत, आणि दुसरीकडे सरकारच्या दुष्काळ आढावा बैठकीत अधिकाऱ्यांसाठी काजू-बदाम आणि पंचपक्वान्न ठेवले जातात. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे वसमत तालुक्यात काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वसमत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
कृषिमंत्र्यांचा ताफा अडवला, प्रचंड घोषणाबाजी
मराठवाड्यातील दुष्काळासंदर्भात आढावा बैठक व पाहणी करण्यासाठी आलेल्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा आज पुयणी-निळा या रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी अडवून प्रचंड घोषणाबाजी केली. कृषिमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे नांदेडकडे येत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा पुयणी-निळा येथे अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रचंड घोषणाबाजी करत काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. जमावाने दत्तात्रय भरणे यांची गाडी अडवली आणि त्यांना दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी केली. यावेळी कार्यकर्ते संतप्त झाले होते. घोषणाबाजी सुरू असतानाच या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार, शंकर शिंदे, गणेश कोकाटे, गोविंद पाटील, मुरलीधर कल्याणकर, नागराज सुलगेकर, संजय कौठेकर, अक्षय नलगे, जगदीश पावडे, प्रकाश दिपके, राजू जनकवाडे, अंकुश कदम यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Comments are closed.